पुणे : कुत्र्यांसाठी आता ‘फिडिंग स्पॉट’ ; महापालिकेची योजना | पुढारी

पुणे : कुत्र्यांसाठी आता ‘फिडिंग स्पॉट’ ; महापालिकेची योजना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुत्र्यांना खाऊ घालणार्‍या, त्यांची काळजी घेणार्‍या प्राणिमित्रांबद्दल पालिकेला बर्‍याच तक्रारी प्राप्त होतात. अशा तक्रारींचे कायमस्वरुपी निराकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘फिडिंग स्पॉट’ तयार केले जाणार आहेत.  सोसायट्या, निवासी संकुलांच्या परिसरात त्यांच्या मान्यतेने फिडिंग स्पॉट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यादृष्टीने अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया, पशुसंवर्धन आणि वैद्यकीय विभाग, महापालिका आरोग्य विभाग, क्षेत्रीय कार्यालये, प्राणिप्रेमी संघटना आणि व्यक्ती, सोसायट्या आदींची एकत्रित बैठक आयोजित केली जाणार आहे.

बरेचदा प्राणिप्रेमी कुत्री, मांजरांना रस्त्यावर खाऊ घालत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता होते, दुर्गंधी पसरते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. अशावेळी, कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याचा नागरिक परस्पर प्रयत्न करतानाही आढळून आले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, भटक्या कुत्र्यांचे बेकायदेशी स्थलांतर हा दंडनीय गुन्हा आहे. कुत्रे, मांजरांना कोणतीही व्यक्ती, संस्था, समिती परिसरातून हाकलून लावू शकत नाही. मात्र, नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागू नये, यासाठी प्राणिप्रेमींनी ठरवून दिलेल्या फिडिंग स्पॉटवरच खाऊ घालावे, अशी मार्गदर्शक तत्त्वे आणि जागा महापालिकेतर्फे लवकरच ठरवून दिल्या जाणार आहेत.
भटक्या कुत्र्यांसाठी फिडिंग स्पॉट तयार करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने संबंधित विभाग, संस्था आणि व्यक्तींची बैठक घेतली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनाही याबाबतच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
– डॉ. सारिका फुंडे,  पशुवैद्यकीय अधिकारी,  पुणे महापालिका.

Back to top button