पुणे : जिल्हा परिषदेच्या अडीचशे उपशिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर | पुढारी

पुणे : जिल्हा परिषदेच्या अडीचशे उपशिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 241 उपशिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली आहे. याशिवाय 125 शिक्षणसेवकांना उपशिक्षक म्हणून नियमित केले आहे. यामुळे मागील तीन वर्षांपासून सहा हजार रुपयांवर काम करणार्‍या शिक्षणसेवकांना इतर शिक्षकांप्रमाणे नियमित पगार मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील काही शिक्षक हे 2020 पासून वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र होते.

परंतु, कोरोना संसर्गामुळे ही वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली नव्हती. ती आता मंजूर केली आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्यांमध्ये हवेली तालुक्यातील सर्वाधिक 42 उपशिक्षकांचा समावेश असून, सर्वांत कमी म्हणजेच केवळ प्रत्येकी एका पुरंदर, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेत उपशिक्षक म्हणून नियमित झाल्यापासून पुढे सलग 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. मात्र, याचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शिक्षकाने या सेवा कालावधीत किमान तीन आठवड्यांचे अध्यापन कौशल्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.

Back to top button