पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; शिष्टमंडळाचे केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत साकडे | पुढारी

पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; शिष्टमंडळाचे केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत साकडे

चाकण; पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची वाहतूक कोंडीविरोधी कृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. नाशिक फाटा ते राजगुक्षसनगर यादरम्यानच्या कामाला गती मिळावी व ते लवकर सुरू व्हावे, यासाठी निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली. मागील महिन्यामध्ये चाकण परिसरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंत्री गडकरी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. या महिनाअखेरीस या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे सुतोवाच नितीन गडकरी यांनी केले होते.

त्यानंतर या बाबीची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी चाकण परिसरातील शिष्टमंडळ पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिल्ली येथील निवासस्थानी भेटले. रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे, अशी आग्रही मागणी केली. रोजच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेतच, परंतु स्थानिक व्यापार्‍यांना यामुळे खूप त्रास होत असून, त्यांच्या व्यापारावर फार मोठा परिणाम झाला आहे. यामुळे तातडीने या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, अशी मागणी या वेळी कृती समितीचे अध्यक्ष कुमार गोरे, सतीश गोरे, मोबीन काझी, राम गोरे आदींनी केली.

Back to top button