पुणे : तीन हजार 715 गुन्हेगारांची झाडाझडती | पुढारी

पुणे : तीन हजार 715 गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील तीन हजार 715 गुन्हेगारांची कोम्बिंग ऑपरेशनद्वारे झाडाझडती घेतली. मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करून 650 सराइतांना अटक केली. गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी चार वेळा विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील पथके तसेच गुन्हे शाखेची पथके या कारवाईत सहभागी झाली होती.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील 473 ठिकाणे, ज्यात विविध हॉटेल्स, ढाबे, लॉज, बसस्थानके तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसराची पोलिसांनी तपासणी केली. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून एक हजार 463 वाहनचालकांची तपासणी केली.

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या भागांत कारवाई केली. या कारवाईत विविध गुन्ह्यातील 650 आरोपींना अटक करण्यात आली.

Back to top button