पुणे: शेतमाल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळयात, नारायणगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे: शेतमाल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळयात, नारायणगाव पोलिसांची कारवाई

नारायणगाव, पुढारी वृतसेवा: सोयाबीन, भुईमूग, कांदे आदी शेतीमाल चोरून नेणाऱ्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५० किलो वजनाच्या सोयाबीनच्या १० गोण्या हस्तगत करण्यात आल्याचे नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली. संभाजी उपशाम (वय ३४, रा. बेल्हे, ता. जुन्नर), संभाजी उपशाम (रा. बेल्हे), अभिषेक शंकर मोरे, वय २०, रा, खोडद, ता जुन्नर), सुरज विलास भुतांबरे (वय २६, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत.

नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रविण विलास पानमंद (वय ३५, रा. खोडद) यांनी सोयाबीनच्या ५० किलो वजनाच्या एकूण ३७ गोण्या पॅक करून घराजवळील शेडमध्ये ठेवल्या होत्या. त्यातील २० गोण्या चोरट्यांनी पळवून नेल्या. यासह इतर काही शेतकऱ्यांच्या शेतमाल चोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांचेकडे दिला. खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार धुर्वे, पोलिस नाईक दिनेश साबळे आदींच्या पथकाने सापळा रचून वरील चौघांना अटक केली. त्यांनी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन, भुईमूग, कांदे आदी शेतमाल चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या सोयाबीन गोण्यांपैकी प्रत्येकी ५० किलो वजनाच्या १० गोण्या हस्तगत केल्या.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सनिल धनवे,पोलिस नाईक दिनेश साबळे, पोलिस का’न्सटेबल सचिन कोबल, गोरक्ष हासे, अविनाश वैदय, दत्ता ढेंबरे, शैलेश वाघमारे, संतोष सांळुके, होमगार्ड आकाश खंडे, पोलिस मित्र भरत मुठे यांचे पथकाने केली.

Back to top button