बेल्हेच्या सरपंचपदासाठी दिग्गजांची ‘फिल्डिंग’ | पुढारी

बेल्हेच्या सरपंचपदासाठी दिग्गजांची ‘फिल्डिंग’

बेल्हे(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने बेल्हे या गावात या पदासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दिग्गजांनी या पदासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावली आहे. कोरोनानंतर लम्पी या जनावरातील संसर्ग आजारामुळे, बंदीमुळे बाजारपेठेतील मंदी, ओला दुष्काळ, रोगराईचे संकट समोर असूनही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांमध्ये आतापासूनच नवचैतन्य संचारले आहे. बेल्हे गावच्या सरपंचपदाची मुदत 29 जून 2023 रोजी संपुष्टात येत आहे.

या निवडणुकीत बेल्हे गावचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी असल्याने राजकीय धुरिणांनी अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिग्गजांनी आपल्या कारभारणीसाठी कुणबीचा दाखला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चाचपणी सुरू केली आहे. चार महिन्यांनी होणार्‍या बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत बेल्हे-जेजुरी रखडलेला रस्ता, अतिक्रमणे, कचर्‍याची विल्हेवाट प्रश्न, शौचालयातील मैला विल्हेवाट, पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, यापेक्षाही बेल्हे गावचे सरपंचपद निवडणूक हाच प्राधान्याचा विषय ठरला असून, निवडणुकीचे वारे गेल्या काही महिन्यांपासून वाहत आहे.

गावातील विविध क्षेत्रांतील पदाधिकार्‍यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. यंदा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. चार महिन्यांनी होणार्‍या आगामी बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आपापले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्रित आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

सरपंचपदासाठी निवडणुकीत उतरणारे इच्छुक सरपंच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलने करण्याऐवजी वाढदिवस, निधन, दशक्रिया, अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावत आहेत. त्यामुळे आगामी काळात बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर अधिकच वाढत जाईल, यात शंका नाही.

Back to top button