सिंहगडाच्या सुरक्षेसाठी वन विभाग सरसावला; विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू | पुढारी

सिंहगडाच्या सुरक्षेसाठी वन विभाग सरसावला; विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या साडेसात लाख रुपयांच्या मशिनरी चोरी प्रकरणात स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यासह सहा चोरट्यांचा सहभाग असल्याचे नुकतेच पोलिस तपासात निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर वन खात्याने गडाच्या
सुरक्षेसाठी रविवारपासून उपाययोजना सुरू केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांनी दिली. गडावरील चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता सुनील शिवाजी चव्हाण (वय 23, रा. मोरदरी, ता. हवेली) असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्यासह आकाश काळुराम चव्हाण, दादा बबन चव्हाण, शुभम रोहिदास भंडलकर, शंभू दत्तात्रय शितकल व सहिमुद्दीन सज्जाद अली यांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.

गडावरील वाहनतळावर कड्यालगत उभारण्यात आलेल्या शेडमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाची मशिनरी बसविण्यात आली होती. गेल्या महिन्यात 18 ते 22 डिसेंबर यादरम्यान चोरट्यांनी मशिनरी व साहित्य चोरून नेले. हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही चोरट्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी चोरट्यांचा शोध न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वरील सहा जणांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने गडाच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी रविवारपासून सुरू केल्याचे सकपाळ यांनी सांगितले.

आमदार भीमराव तापकीर म्हणाले, ‘सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पाची गरज आहे का? याचा अभ्यास न करताच लाखो रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला. स्थानिक वन व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वन विभागाने निर्णय घेणे गरजेचे आहे.’
यापूर्वीही सिंहगडावर डांबर, लोखंडी आदी साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नव्हता. मात्र, कचरा प्रकल्पाच्या मशिनरींच्या चोरीबाबत तापकीर यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या आहेत उपाययोजना…
गडावर तसेच गडाच्या दोन्ही मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह स्थानिकांना ओळखपत्र देणे.
कोंढणपूर- अवसरवाडी मार्गावर गेट बसविणे.
गडावर चोवीस तास पाहरा तैनात ठेवणे.

सिंहगडावरील कचरा प्रकल्पाची यंत्रसामग्री चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. गडाच्या सुरक्षेसाठी वन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यापुढे सायंकाळी सहानंतर सिंहगडावर प्रवेशबंदी असणार आहे.

                                                                  – प्रदीप सकपाळ,
                                                                 वनपरिक्षेत्र अधिकारी

सिंहगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, वनसंपदा, मालमत्तेचे जतन व्हावे, यासाठी स्थानिक रहिवाशांनी पुढे यावे. गडामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गडाचे संरक्षणही महत्त्वाचे आहे.

                                             – नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

 

Back to top button