आंबेगावच्या पूर्वभागात कांदा काढणी वेगात | पुढारी

आंबेगावच्या पूर्वभागात कांदा काढणी वेगात

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पोंदेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, खडकवाडी वाळुंजनगर, लाखणगाव, वडगावपीर, मांदळेवाडी आदी गावांमध्ये कांदा काढण्याची व लागवडीची लगबग जोरात सुरू आहे. कांदा काढण्याची व लागवडीची कामे एकाचवेळी सुरू असल्याने मजूर टंचाई भासत आहे. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. खेड, आंबेगाव जुन्नर, शिरूर हे तालुके कांद्याचे आगार म्हणून ओळखले जातात.

सध्या कांदा हे पीक परिपक्व झाले असून, शेतकरी सावड पद्धतीने व मजुरांकडून कांदा काढणी करीत आहेत. काढलेला कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो. तर काही शेतकरी अरणीत (कांदा चाळ) साठवून ठेवत आहेत. काही व्यापारी शेतातच कांदा विकत घेतात. कांदा काढणे व लागवड एकाच वेळी सुरू असल्याने मजुरांची वानवा जाणवत असल्याने ज्यादा पैसे देऊन परगावावरून वाहनांची व्यवस्था करून मजूर आणावे लागत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत आहे.

या हंगामात कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे मांदळेवाडी येथील कांदा उत्पादक अप्पा मांदळे, कोंडीभाऊ आदक, पोपट आदक यांनी सांगितले. सध्या जरी कांद्याला चांगला बाजारभाव असला, तरी आवक वाढली, तर बाजार उतरू शकतात. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा. असे झाल्यास भाव उतरले तरी शेतकर्‍यांचे भांडवलतरी वसूल होईल, असे हनुमान आदक, फकिरा आदक यांनी सांगितले.

Back to top button