सहकारच्या पदोन्नत्या रखडल्याने नाराजी; सहकार मंत्रालयात पदोन्नतीच्या फायली पडल्या धूळ खात | पुढारी

सहकारच्या पदोन्नत्या रखडल्याने नाराजी; सहकार मंत्रालयात पदोन्नतीच्या फायली पडल्या धूळ खात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सहकार आयुक्तालयांतर्गत कार्यरत विभागीय सहनिबंधक, अपर निबंधक, अपर आयुक्त या पदांच्या पदोन्नत्या रखडल्याने अधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे, अतिरिक्त पदभाराच्या बोजाने सहकार आयुक्तालयातील अधिकार्‍यांवरही कामाचा ताण येत असताना सहकार मंत्रालयातील पदोन्नतीच्या फायलींवरील धूळ कधी हटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सहकार खात्यात अपर आयुक्त व इतर दोन पदे गेली काही महिने रिक्तच आहेत.

अतिरिक्त पदभार देऊन हे काम सुरू ठेवण्याची परंपरा सहकारमंत्री अतुल सावे कधी खंडित करणार? असा प्रश्न अधिकार्‍यांमधूनच विचारला जात आहे. सहकार आयुक्तालयात अपर आयुक्त व विशेष निबंधकाचे एक पद आणि दुसरे राज्याचे पणन संचालक या पदाचा समावेश आहे. सध्या पणन संचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नसून, अतिरिक्त पदभार देऊन काम सुरू आहे.

आयुक्तालयातील अपर निबंधक (पतसंस्था) ज्ञानदेव मुकणे यांच्याकडे अपर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, राज्य बँक, जिल्हा बँका, विकास सोसायट्या, सावकारी यांचेही काम आहे. तर दुसरे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांच्याकडे रिक्त असलेल्या अपर निबंधक (गृहनिर्माण) पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. दरम्यान, अपर निबंधक सुधीर तुंगार यांचे नाव पणन संचालक पदासाठी अग्रक्रमाने घेतले जात असून, लवकरच आदेश येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

विभागीय सहनिबंधक पदावरून अपर निबंधक पदावर पदोन्नती देण्यामध्ये सध्या तीन नावे असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये मंत्रालयातील सहकारचे विशेष कार्याधिकारी श्रीकृष्ण वाडेकर, औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक शरद जरे आणि लातूर विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांचा समावेश आहे. तसेच नंतरच्या अपर निबंधक पदाच्या पदोन्नतीमध्ये अधिकार्‍यांचा भरणा तुलनेने जास्त असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे सहकार मंत्रालय याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे
लक्ष आहे.

बाजार समिती प्रशासक बदलणार?
मुंबई, पुणे आणि नागपूर या मोठ्या उलाढालीच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सहकार विभागातील अपर निबंधक दर्जाचा अधिकारी प्रतिनियुक्तीने सचिवपदी नियुक्त करता येतो. सध्या पुणे बाजार समितीवरील सहकारचे उपनिबंधक प्रशासकपदी कार्यरत असून, त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. राज्यातील सत्तांत्तरानंतर भाजपने याबाबत पावले उचलल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने सहकार अपर निबंधक नाही, तर काही उपनिबंधकांची नावे मंत्रालय स्तरावर चर्चेत असून, काहींनी सचिव व प्रशासकपदासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे सहकार आयुक्तालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Back to top button