पळसदेव भागात पट्टकदंबहंस पक्ष्यांचे आगमन; विविध जातींचे पक्षी येण्याची शक्यता | पुढारी

पळसदेव भागात पट्टकदंबहंस पक्ष्यांचे आगमन; विविध जातींचे पक्षी येण्याची शक्यता

प्रवीण नगरे

पळसदेव : कैलास-मानस सरोवरला भेट देणार्‍या पर्यटकांना हमखास दर्शन देणार्‍या पट्टकदंबहंस या देखण्या पाहुण्या पक्ष्यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावच्या शिवारात पसरलेल्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गर्दी केली आहे. हे हंस हिवाळ्यात बहुसंख्येने उजनी जलाशयासह इतरत्र येत असतात. पळसनाथाच्या दारी हे हंस सध्या दिमाखदार चालीने वावरत आहेत. पट्टकदंबहंस, कादंबहंस व पट्टेरी राजहंस या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परदेशी पाहुण्यांना इंग्रजीत ‘बार हेडेड गूज’ म्हणतात.

उजनी परिसरात यावर्षी पर्जन्यमान अधिक झाल्याने आणि धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने विविध पक्ष्यांचे आगमन लांबले असले, तरी गेल्या महिनाभरापासून पट्टकदंब या देखण्या पक्ष्याचे पळसदेव परिसरात आगमन झाले आहे. धरणात पक्ष्याचे खाद्य मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे पाणीसाठा कमी होताच उथळ पाण्याच्या ठिकाणी विविध जातींचे पक्षी खाद्यासाठी येण्याची शक्यता आहे.

हे हंस हिवाळ्याच्या प्रारंभी भारतातील पठारी प्रदेशातील जलस्थानावर उदरनिर्वासाठी येतात. शीतकाल सरतेवेळी हे हंस हिमालयाकडे कूच करतात. पहाटेच्या वेळी हे हंस अँग..अँग…असा आवाज करत एकमेकांना साद घालत असतात. समूहाने हे पक्षी खाद्यान्न शोधत असतात. खाद्यावर ताव मारताना काही कारणाने एकदम थव्याने उड्डाण घेतल्यावर सूर्यप्रकाशात त्यांच्या पंखाखालील कातडीची चमक पक्षी निरीक्षकांना मोहवून टाकते.

ऐटबाज...
पांढरेशुभ्र डोके त्यावर दोन काळे समांतर पट्टे ही या ऐटबाज हंसांना ओळखण्याची खूण आहे. या हंसाची चोच गुलाबी, तर पाय नारंगी पिवळे असतात. राखी रंगाच्या पंखावर काळेपट्टे असतात. शेपटीचे मूळ व टोक शुभ्र असतात.

नव्वदच्या दशकापर्यंत हे हंस पक्षी पुणे व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वाहणार्‍या निरा नदीपात्रात वावरताना दिसून येत होते. सध्या ही नदी प्रदूषणाने ग्रासल्याने या पक्ष्यांनी तिकडे पाठ फिरवली आहे. दुपारच्या वेळी हे पक्षी आडोसा पाहून विश्रांती घेतात. अशा बेसावध वेळी या पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता असते.

                                     – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

Back to top button