पिंपरी : मोशी बंधार्‍यावरील रस्ता धोकादायक | पुढारी

पिंपरी : मोशी बंधार्‍यावरील रस्ता धोकादायक

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशी येथील इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याला दोन्ही बाजूने संरक्षक कठडे नसल्यामुळे येथून वावरणार्‍या नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. अनेक वेळा मागणी करूनही हे सुरक्षा कठडे बसविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोशी येथील इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ‘जैसे थे’च बनला आहे. वारंवार याबाबत मागणी करून देखील सुरक्षा कठडे बसविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाचे वतीने या ठिकाणी 38 वर्षांपूर्वी हा बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधार्‍यामुळे येथील शेती जल सिंचनाला पाणी उपलब्ध झाले असून त्यामुळे शेती व्यवसाय समृद्ध झाला आहे.

मात्र, काही वर्षांपूर्वी या भागात औद्योगिकीकरण झाले असून रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी असलेल्या भाड्याच्या खोल्या घेऊन राहत आहेत. मोशी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत असून नदीपलीकडील चिंबळी गाव ग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावांना जोडणारा हा बंधारा असून या बंधार्‍यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करत असतात.

नोकरी, शिक्षणासाठी मोशीला येण्यासाठी चिंबळी (ता.खेड ) येथील नागरिक या बंधार्‍याचा दिवसरात्र वापर करत असतात. मुळात हा बंधारा वाहतुकीसाठी नसून पाणी साठवणुकीसाठी आहे. परंतु यावर दहा फूट सिमेंट रस्ता असल्याने बंधारा बांधल्यापासून यावरून वाहतूक होत आहे. आता ही वाहतूक गरजेची बनली असून दोन गावांना कमी वेळात जोडणारा आणि वेळेची बचत करणारा मार्ग म्हणून या रस्त्याची वाहन चालक निवड करत आहेत. पादचारी देखील या बंधार्‍यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. ऊन असो वा पाऊस बंधार्‍यावरील वाहतूक थांबलेली नाही. परंतु रस्ता दहा फुटी व दोन्ही बाजूला खोल नदी असा हा धोकादायक रस्ता आहे. पूर्वी वाहतूक कमी असल्याने बंधारा ओलांडणे सोपे होते. परंतू आता वाहतूक अधिक असून दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने एखादे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे या बंधार्‍यावर लोखंडी कठडे उभारल्यास पादचार्‍यांना चालणे व वाहन चालकांना वाहने चालविणे सुरक्षित होणार आहे.

संरक्षण कठडा उभारण्याची मागणी 

यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाशी समन्वय साधून या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठडे उभरावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button