बारामती : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण | पुढारी

बारामती : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करूनही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. शहरातील वर्दळीची ठिकाणे आणि मुख्य चौकात ही कुत्री रस्त्याच्या मधोमध उभी अथवा बसलेली असतात व वारंवार रस्त्यावरून ये- जा करतात. यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागते.

टोळीने फिरणारी जनावरे आणि त्यात आता कुत्र्यांची भर पडली आहे. भटकी कुत्री अनेकदा नागरिकांवर हल्लेही करतात. अशा घटना यापूर्वी शहरात घडल्या असल्याने त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भटकी कुत्री, जनावरे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बारामतीकर करत आहेत. मंडई परिसरात असलेल्या कचराकुंड्यांवर, हॉटेल बाहेरील कचराकुंड्यांवर तसेच हॉटेलमधील शिळ्या पदार्थांवर या कुत्र्यांची गुजराण होत असल्याने याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरातील मुख्य असलेला भिगवण चौक, तीन हत्ती चौक, सुभाष चौक, गांधी चौक, सिनेमा रोड, भाजीमंडई, गुणवडी चौक, इंदापूर रस्ता, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्ता, पाटस रोड, शहरातील सर्वच मुख्ये रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आदी भागांत या कुत्र्यांचे वास्तव्य आहे. एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला असतानाच या मोकाट जनावरे व भटक्या कुर्त्यांमुळे बारामतीकर हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा भटक्या कुत्र्यांच्या व जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Back to top button