पुणे : गहू, हरभरा पिकाला फायदा वाढत्या थंडीचा | पुढारी

पुणे : गहू, हरभरा पिकाला फायदा वाढत्या थंडीचा

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र थंडी वाढली असून रब्बी हंगामातील पिकांना या थंडीचा मोठा फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.  तब्बल दोन महिने थंडी गायब झाल्याने या भागातील शेतकरी चिंतेत होते. थंडीअभावी शेतक-यांची रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका व कांदा ही पिके धोक्यात सापडली होती. अतिथंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असून पिके जोमात येतात व रोगाचा प्रादुर्भाव देखील या थंडीत कमी जाणवतो. त्यामुळे थंडी ही पिकांसाठी पोषक ठरत आहे.

थंडी गायब होऊन निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, कांदा, हरभरा, मका, गहू इत्यादी पिके धोक्यात येऊन पिके बाधित होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. पिके वाचविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांच्या फवारण्या करून प्रयत्नांची परकाष्ठा करत होते, परंतु आता आलेल्या थंडीमुळे या भागातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. थंडीने तात्पुरती का होईना रब्बी हंगामातील उभ्या पिकांच्या वाढीची चिंता दूर झाली आहे.

Back to top button