मंचर : अल्पवयीन मुलाच्या आईस अटक; पोस्कोअंतर्गत गुन्ह्यात पारगाव पोलिसांची कारवाई | पुढारी

मंचर : अल्पवयीन मुलाच्या आईस अटक; पोस्कोअंतर्गत गुन्ह्यात पारगाव पोलिसांची कारवाई

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पारगाव पोलिस ठाणे येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यातील अल्पवयीन मुलास त्याच्या आईने प्रोत्साहन दिल्याचे तसेच सदरचा गुन्हा त्या दोघांनी संगनमताने केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार मुलाच्या आईस अटक करण्यात आली आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव पोलिस ठाण्यात महिन्यापूर्वी पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर सदर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपासात मुलास त्याच्या आईनेच प्रोत्साहन दिल्याचे तसेच सदरचा गुन्हा त्या दोघांनी संगनमताने केल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या आईचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिला गुरुवारी (दि. 5) सकाळी अटक करण्यात आली. तिला राजगुरुनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर महिलेस न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी महिलेची रवानगी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पालकांनी पाल्यांना चुकीच्या पद्धतीने समर्थन करू नये. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रोत्साहन देणे किंवा पाठीशी घालू नये. असे केल्यास पालकांनादेखील अटक होऊ शकते, असे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले.

Back to top button