भीमा कोरेगाव : विजय रणस्तंभ अभिवादनासाठी अलोट गर्दी (फोटो) | पुढारी

भीमा कोरेगाव : विजय रणस्तंभ अभिवादनासाठी अलोट गर्दी (फोटो)

कोरेगाव भीमा/शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : शौर्य दिन उत्सव आणि विजय रणस्तंभ मानवंदना रविवारी (दि. १) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे शांततेत व सुरळीत पार पडली. मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटाने विजय रणस्तंभाभोवती फटाके फोडून २०५ व्या शौर्य दिनाच्या उत्सवास जल्लोषात सुरुवात झाली. पहाटे ४ वाजल्यापासून भीम अनुयायी विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी सज्ज झाले. दुपारनंतर भीम अनुयायांचा महापूर लोटला होता.

सकाळपासून अनेक मान्यवरांनी विजय रणस्तंभास अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदींनी अभिवादन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. अभिवादनासाठी अनुयायांनी पहाटेपासून गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे अभिवादन सोहळा शिस्तीत पार पडला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.

जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली. आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यवस्थेची पाहणी केली. पीएमपीएमएलने लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी १४० बसगाड्या सुरू ठेवल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

अंतर्गत प्रवासासाठी ३६० बसगाड्यांमधून मोफत सुविधा

अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने नियोजन करून शिक्रापूर येथे १८०, तर लोणीकंद येथून १८० अशा एकूण ३६० बसगाड्यांची मोफत सेवा पुरविण्यात आली. यासाठी दोन शिफ्टमध्ये सुमारे दीड हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, पुण्याहूनदेखील पेरणे येथे जाण्यासाठीही आज वाढ करून ९० बसगाड्या सोडण्यात आल्याचे पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले. येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यात आली होती.

कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायांची वाहने शिक्रापूर व लोणीकंद येथील वाहनतळावरच थांबवून तेथून ३६० बसगाड्यांमधून त्यांना कोरेगाव भीमा-पेरणे या ठिकाणी विजय रणस्तंभ व वढू बुद्रुक येथे छत्रपती शंभू महाराज समाधी, गोविंद गोपाळ समाधी परिसरात अभिवादनासाठी ने-आण करण्यात येत होती. तसेच, मानवंदना दिल्यानंतरदेखील लगेचच सर्व बांधवांना पुन्हा पार्किंगजवळ आणून सोडले जात होते. दुपारनंतर गर्दी वाढल्याने बसव्यवस्थेवरही ताण आला. रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीही बसप्रवास करून या सुविधेचा आढावा घेत बसमधील प्रवाशांशीही संवाद साधला.

विदर्भ, मराठवाड्यातील अनुयायी मोठ्या संख्येने

विजय रणस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व नगर जिल्ह्यांतून येणाऱ्या अनुयायांनी गर्दीचा विक्रम प्रस्थापित केला. या भागातून समोर तीन लाख अनुयायी आल्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भातून येणारे अनुयायी नगरमार्गे शिक्रापूर येथे पोहोचत होते. शिक्रापूर येथे हॉटेल तोरणाजवळ सुमारे साडेचार हजार वाहनांच्या पार्किंगची सोय केली होती. हे पार्किंग पहाटे पाचच्या दरम्यानच तुडुंब भरले होते. याच वेळी शिक्रापूर येथे नगर रस्त्यावरील मुलाणी पार्किंग येथे दक्षता बाळगून प्रशासनाने सुविधा तयार केली होती.

या ठिकाणीदेखील सुमारे पाच हजार वाहने दाखल झाली होती. दरम्यान शिक्रापूर येथील दोन्हीही वाहनतळावर शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच प्रशासनाच्या वतीने मोबाईल शौचालय, मोफत आरोग्य सेवा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

हेही वाचा;

Back to top button