पुणे : पुस्तकांची माहिती आता एका क्लिकवर | पुढारी

पुणे : पुस्तकांची माहिती आता एका क्लिकवर

सुवर्णा चव्हाण

पुणे : तुम्ही यवतमाळला असाल अन् तुम्हाला पुण्यातील शासकीय ग्रंथालयात कोणते पुस्तक आहे याची माहिती एका क्लिकवर घरात बसून मिळाली तर ? हो, हे आता शक्य होणार आहे. राज्यभरातील वाचकांना आता घरबसल्या 43 शासकीय ग्रंथालयांतील पुस्तकांची माहिती एका क्लिकवर मिळणार असून, ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यात असलेल्या 43 शासकीय ग्रंथालयांतील सुमारे 43 लाख पुस्तकांची ई-सूची तयार करण्याचे काम सुरू आहे.

लवकरच पुस्तकांची संपूर्ण सूची संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. राज्यभरात असलेल्या वाचकांना याद्वारे शासकीय ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती मिळणार आहे. 31 मार्चपर्यंत ई-सूची तयार करण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी सांगितले.

ग्रंथालयांमधील अधिकाधिक पुस्तके वाचकांना उपलब्ध व्हावीत आणि ग्रंथालयांनी ई-ग्रंथालयाच्या दृष्टीने वाटचाल करावी, यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात 43 शासकीय ग्रंथालये आहेत. त्यात प्रत्येक जिल्ह्यात एक, अशी 36 शासकीय जिल्हा ग्रंथालये, 1 राज्य मध्यवर्ती ग्रंथालय यांसह पुणे, अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि औरंगाबाद विभागांची मिळून 6 शासकीय विभागीय ग्रंथालये आहेत.

नॅशनल इन्फॉरर्मेटिक्स सेंटरच्या ई-ग्रंथालय सॉफ्टेवअरचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने पुस्तकांची नोंदणी करण्यात येत असून, तर काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनेही पुस्तकांची नोंदणी केली जात आहे. या दोन्ही पद्धतीने पुस्तकांची ई-सूची तयार करण्याचे काम सुरू असून, ही ई-सूची ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय, पुस्तक कुठल्या शासकीय ग्रंथालयात उपलब्ध असेल, याचीही माहिती याद्वारे मिळणार आहे.

क्षीरसागर म्हणाले, ’सध्या संचालनालयाकडून ग्रंथालये कशी ई-ग्रंथालये बनू शकतील आणि वाचक केंद्रित कशी होतील, यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय ग्रंथालयातील पुस्तकांची ई-सूची तयार करण्याचे काम घेण्यात आले आहे. सध्या ई-सूची तयार करण्याच्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे.

पुस्तकांच्या नोंदणीचे काम करीत आहोत. 31 मार्चपर्यंत ई-सूचीचा हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. ई-सूची तयार करण्याच्या या प्रकल्पाचे काम 2018 पासून सुरू आहे. कोरोनामुळे काही काळ या प्रकल्पाचे काम थांबले होते. पण, आता त्याचे काम वेगाने सुरू असून, ते प्रगतिपथावर आहे.’ संचालनालयाच्या संकेतस्थळावर ई-ग्रंथालय या पर्यायावर शासकीय ग्रंथालयांशी संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. तर, ग्रंथालयांच्या पुस्तकांची माहितीही असेल. ग्रंथालयाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव यावरून पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Back to top button