पुणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मटण, मासळी, चिकनवर ताव | पुढारी

पुणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मटण, मासळी, चिकनवर ताव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 31) घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून मटण, चिकन व मासळीला चांगली मागणी राहिली. मासळी, मटण व चिकनच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात गर्दी झाली होती. या वेळी चिकन, मटणाचे दर स्थिर होते, तर सुरमई, पापलेट, कोळंबी, रावस, हलवा, ओले बोबिंलच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खवय्यांची गर्दी होती. कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट, फर्ग्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्केट परिसरात गर्दी झाली होती तसेच पौड फाटा, विश्रांतवाडी, पद्मावती येथील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी 15 ते 20 टन, आंध्र प्रदेशातून राहू, कतला, सीलन या मासळीची 15 ते 20 टन, नदीतील मासळी 500 किलो, खाडीतील मासळी 200 ते 400 किलो अशी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
मटण – 700 रुपये
चिकन – 220 रुपये
पापलेट – 700 ते 1800 रुपये
हलवा – 500 ते 650 रुपये
सुरमई – 400 ते 550 रुपये
ओले बोंबिल – 200 ते 360 रुपये
कोळंबी – 160 ते 800 रुपये

Back to top button