पुणे : वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन उत्साहात | पुढारी

पुणे : वृत्तपत्र विक्रेता संघाचा वर्धापनदिन उत्साहात

पुणे : सदैव सेवेस सज्ज असलेले पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जगभरातील चालू घडामोडी वर्तमानपत्रांमार्फत वाचकांच्या दारापर्यंत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र अविरत सेवा देऊन आपल्या आवडीचे वर्तमानपत्र वाचकांना पोहोचविणारे आपले पेपरवाले नव्हे तर वर्तमानदूतच्या भूमिकेत असणार्‍या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा 38 वा वर्धापनदिन नारायण पेठ या कार्यालयात उत्साहात झाला. एकूण 2500 विक्रेते असणार्‍या या संघटनेच्या वतीने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड भागातील विविध विभागांमध्ये पहाटे वृत्तपत्रांचे पूजन करून केक कापून व पेढे वाटून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त संघटनेच्या नारायण पेठ येथील मुख्य कार्यालयात श्रीसत्यनारायण महापूजा व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी विक्रेत्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता आपला हा व्यवसाय कसा वाढेल व त्यासाठी संघटना नेहमीच विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही देऊन कोरोना काळामध्ये विक्रेत्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वाचकांना वेळेत सेवा देऊन सदैव सेवेस सज्ज या ब्रीदवाक्याला साजेसे काम केल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, खजिनदार संजय भोसले, विश्वस्त संदीप शिंदे, बाळासाहेब काळे, संतोष लोहार, प्रवीण माने, बापू वाळके, यशवंत वादवणे, यतीन चौधरी, राजू रसाळ, सुनील पवार, सचिन मुंगारे, सुनील बरके, वसंत घोटकुले, सलीम सय्यद यांच्यासह सर्व विभागांमधील विभागप्रमुख व पदाधिकारी, वाचक, विक्रेते व सर्व प्रेसव्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यालयातील कार्यक्रमाचे नियोजन अप्पा बळवंत चौक विभागातील कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने करण्यात आले.

Back to top button