पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वीज जोडणीचा मुद्दा विधानसभेत | पुढारी

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वीज जोडणीचा मुद्दा विधानसभेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील विजेअभावी अंधारात सुरू असलेल्या अंगणवाड्यांचा विषय विधानसभेत गाजला आहे. वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर येत्या जानेवारीपर्यंत सर्व अंगणवाड्यात वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे राज्य शासनाकडून स्पष्ट केले.

पुण्यातील 500 अंगणवाड्यांत वीज व पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचा प्रश्न आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. जुलै 2022 अखेर 1 हजार 181 अंगणवाड्यांत विजेची सुविधाच नाही. जिल्हा परिषदेमार्फत अंगणवाड्यांना तीन हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यानंतर ग्रामीण भागातील सुमारे पाचशे अंगणवाड्यांना वीजपुरवठाच नाही.

तसेच 124 अंगणवाड्यांना 17 लाख विजेची थकबाकी असल्याने वीज बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यातील 117 अंगणवाड्यांना तांत्रिक अडचणीमुळे निधी वितरित झालेला नाही. अंगणवाड्यांना पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याची कारणे काय आहेत, संबंधितांवर कारवाई होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वीस कोटींची तरतूद केली जाणार
येत्या तीन महिन्यांत महिला व बालविकास विभागाकडून 20 कोटींची तरतूद करून सर्व अंगवाड्यांना वीज कलेक्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्या माध्यमातून राज्यातील वीज नसलेल्या सुमारे 60 हजार अंगणवाड्यांना वीज दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी दत्तक योजना सुरू केली आहे. यामधून आदर्श अंगणवाडीची संख्या वाढेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी विधानसभेत व्यक्त केला.

Back to top button