पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाचा दस्तनोंदणीचा सर्व्हर डाऊन | पुढारी

पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाचा दस्तनोंदणीचा सर्व्हर डाऊन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोंदणी व मुद्रांक विभागाचा दस्तनोंदणीचा सर्व्हर बुधवारी पुन्हा डाऊन झाला. त्यामुळे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांसह नागरिक देखील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यपद्धतीवर संतप्त झाले आहेत.

नोंदणी व मुद्रांक विभागाचा सर्व्हर गेल्या तीन ते चार दिवसांपासून वारंवार डाऊन होत आहे. तसेच, बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत या विभागाचे अधिकारी कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याची बाब पुन्हा उघडकीस आली आहे. हा विभाग शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणारा दुसर्‍या क्रमांकाचा विभाग आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका, दुकान आणि जमीन यांचा खरेदी-विक्री करार, हक्कसोड, बक्षीसपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. त्यामुळे सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांत नेहमीच गर्दी असते. त्यातच नोंदणी प्रणालीचा सर्व्हर डाऊन होणे, सर्व्हरचा वेग कमी असणे आदी कारणांमुळे दस्तनोंदणीस वेळ लागतो. त्याच दिवशी दस्तनोंदणी नाही झाली, तर नागरिकांना दुसर्‍या दिवशी हेलपाटे मारावे लागत आहेत.

Back to top button