पुणे : ख्रिसमस हर्षोल्हासात साजरा; लाल रंगातील फुगे उंचावत रस्त्या-रस्त्यांवर जल्लोष | पुढारी

पुणे : ख्रिसमस हर्षोल्हासात साजरा; लाल रंगातील फुगे उंचावत रस्त्या-रस्त्यांवर जल्लोष

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चर्चमध्ये सकाळी झालेली विशेष उपासना…त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले समाजबांधव…घरोघरी रंगलेली ख्रिसमस पार्टी…शहरातील रस्त्यांवर रंगलेला ख्रिसमसचा माहोल अन् लाल रंगातील फुगे, विद्युत रोषणाई अन् गर्दीने फुललेले रस्ते…अशा आनंदी अन् उत्साही वातावरणात रविवारी (दि.25) ख्रिसमसचा सण साजरा झाला. सकाळपासून सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते अन् हा हर्षोल्हास सायंकाळपर्यंत कायम होता. सायंकाळनंतर ठिकठिकाणी रंगलेल्या ख्रिसमस पार्टीचा तरुणाईने आनंद लुटला.

सांताक्लॉजचे मुखवटे अन् सेलिब्रेशन मूड
शहरातील विविध ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. विविध रस्त्यांना ख्रिसमसचे सेलिब्रेशन रूप प्राप्त झाले होते. लाल पेहरावातील तरुणाईच्या हाती लाल फुगे, सांताक्लॉजचे मुखवटे घातलेली तरुणाई अन् विद्युत रोषणाईने रस्त्यांना वेगळेच रूप प्राप्त झाले. हे सेलिब्रेशन रात्रीपर्यंत सुरू होते.

।शहरातील मध्यवर्ती पेठांसह कॅम्प, कोरेगाव पार्क, खडकी, येरवडा, औंध येथील रस्ते आणि दालने आनंदोत्सवात रंगले होते. लाल रंगाचे फुगे, सांताक्लॉजचे मुखवटे, सांताक्लॉजची प्रतिकृती आणि विद्युत रोषणाईने येथील दालने सजली होती. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी अनेकांनी हॉटेलमध्ये गर्दी केली अन् स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटला. खासकरून कॅम्प, डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे रात्रीपर्यंत गर्दी पाहायला मिळाली.

येशू यांच्या जन्मादिनाममित्त शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी सहा ते साडेदहा या वेळेत विशेष उपासनेचे (भक्ती) आयोजन केले हेते. त्यासोबतच चर्चमध्ये आनंद गीते (कॅरल गीते) सादर करण्यात आली होती. याशिवाय फुलांच्या आकर्षक सजावट अन् विद्युत रोषणाईने वेगळेच वातावरण निर्मिले. लाल रंगाच्या पेहरावात समाजबांधव उपासनेसाठी आले होते.

Back to top button