सणसर येथे एकावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल | पुढारी

सणसर येथे एकावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : सणसर येथील शहाजी बापूराव निंबाळकर यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी गुरुवारी (दि. 22) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशा दादा गायकवाड (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशा गायकवाड बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भवानीनगर येथे रेशन दुकानांमध्ये रेशन आले आहे का, हे पाहण्यासाठी गेल्या होत्या.

दुपारी एक वाजेच्या सुमारास घरी परतत असताना भवानीनगर येथील बारामती-इंदापूर रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीजवळ असलेल्या त्यांच्या जमिनीमध्ये शहाजी निंबाळकर उभा होता. गायकवाड यांनी निंबाळकर यांना तुम्ही आमच्या जागेत काय करत आहात असे विचारले असता निंबाळकर यांनी ही जागा आमची आहे, मी आत्ताच मोजणी करून घेतली आहे असे म्हणत अरेरावीची भाषा वापरून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ तसेच दमदाटी केली.

गायकवाड या जोराने ओरडू लागल्याने त्यांच्या चुलती चतुरा दादा सोनवणे या तेथे भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील निंबाळकर यांनी धक्काबुक्की केली व जातीवाचक वक्तव्य केले. यामध्ये आशा गायकवाड यांच्या डाव्या हाताला मार लागला व चतुरा सोनवणे यांनादेखील मार लागल्याने शंकर सोनवणे यांनी या दोघींना इंदापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी विविध कलम व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button