बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न; मंचर येथे कळपातील मेंढीची शिकार | पुढारी

बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न; मंचर येथे कळपातील मेंढीची शिकार

मंचर (ता, आंबेगाव ) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मंचर शहराच्या पूर्वेला असलेल्या मुळेवाडी रस्त्यालगत शुक्रवारी (दि. 23) दुपारी बिबट्याने मेंढपाळ पोपट ढेकळे (वय 25) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचा बचाव झाला. मात्र त्यांच्या कळपातील मेंढीची शिकार करण्यात बिबट्या यशस्वी ठरला.

दरम्यान, शुक्रवारीच पहाटे नितीन महादेव थोरात (रा. मुळेवाडी, मंचर, ता. आंबेगाव) यांच्या गायीला बिबट्याने गंभीर जखमी केल्याचीही घटना घडली आहे, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. भरदुपारी बिबट्याच्या उपद्रवाची माहिती समजताच मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ यांनी ताबडतोब वनपाल संभाजीराव गायकवाड व वनरक्षक पूजा कांबळे यांना घटनास्थळी पाठविले.

गायकवाड यांनी परिसराची पाहणी केली. पण 20 ते 25 एकर जमिनीत दाट झाडी-झुडपे असल्याने शेळीचा शोध घेता आला नाही. ‘या भागात वन खात्यामार्फत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करू. पण, खबरदारीचा उपाय म्हणून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सावधानता बाळगावी,’ असे आवाहन वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button