पुणे शहरात जैन बांधवांचा भारत बंदला प्रतिसाद | पुढारी

पुणे शहरात जैन बांधवांचा भारत बंदला प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जैन समाजाचे मुख्य श्रध्दास्थान महातीर्थ श्री सम्मेत शिखरजी (झारखंड) यांच्या ठिकाणाला तेथील राज्य सरकारने पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केल्यामुळे जैन बांधवांनी भारत बंदची हाक दिली होती. पुण्यातील जैन बांधवांनी यात सहभागी होऊन बंद यशस्वी केला. झारखंड सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील समस्त जैन समाजाने भारत बंदचा पुकारला होता. त्यानुसार मार्केटयार्ड येथील जैन घाऊक व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून विरोध दर्शविला.

झारखंड सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या बंदला मार्केटयार्ड गूळ भूसार विभागातील जैन व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला आणि स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती, अशी माहिती दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. जैन धर्मियांची श्रध्दा असणा-या परमात्मास्वरूप 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांनी कठोर तपस्या व ध्यानधारणा करून झारखंड राज्यातील जंगल प्रदेशात सर्वांत उंच असणा-या या डोंगरावर मोक्षप्राप्ती झाली आहे.

पर्यटनस्थळ झाल्यानंतर आज पर्यावरणाच्या दृष्टीने समृध्द असणा-या याठिकाणी सरकारी हस्तक्षेप होऊन या जंगलाच्या भूभागावरील झाडे कापली जातील. आदिवासी, जंगली श्वापदे, जनावरे, पशुपक्ष्यांचा अधिवास धोक्यात येईल. विविध प्रकारची बांधकामे, अतिक्रमणे होतील. तारांकित हॉटेल्स, पब, कॅसिनोज्, रेस्टॉरंटस्, मांसमच्छीची विक्री, दारूची दुकाने, जुगार अशा अनेक गोष्टी पर्यटकांच्या सोयींकरिता त्याठिकाणी सुरू होतील. ही तपोभूमी आहे, पर्यटनस्थळ नव्हे.

जैन धर्मियांच्या श्रध्देचं स्थान असणार्‍या या भूमीला शुध्दता व पवित्रतेची हजारो वर्षांची परंपरा आहे. हे क्षेत्र जसे आहे तसेच ठेवावे, अशी मागणी विश्वभरातल्या सर्व जैन समाजाकडून व साधूसंतांकडून होत आहे. अशा धार्मिक स्थळांशी छेडछाड करून जैन तत्त्वांना, संस्कारांना छेद निर्माण होईल असे काम सरकारने केल्यास अहिंसावादी असणारा जैन समाज ते कदापिही सहन करणार नाही,
असे मत जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र विभागाचे व्हाईस चेअरमन आणि जिनेंद्र सोशल फाउंडेशनचे चेअरमन दिलीप मेहता यांनी व्यक्त केले.

Back to top button