पुणे : महापालिकेच्या वाहनचालकांच्या जादा कामाचे 25 तास कमी | पुढारी

पुणे : महापालिकेच्या वाहनचालकांच्या जादा कामाचे 25 तास कमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वाहनचालकांना एक महिन्यात दिल्या जाणार्‍या जादा तासांतून 25 तास कमी केले असून, आता एका महिन्यात केवळ 50 जादा तासांचेच पैसे मिळणार आहेत. महापालिकेकडे विविध प्रकारची 1 हजार 379 वाहने आहेत. त्यापैकी अग्निशमन आणि कचरा वाहतुकीची वाहने तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. ही वाहने चालविण्यासाठी महापालिकेकडे कायमस्वरूपी व कंत्राटी पद्धतीने घेतलेले वाहनचालक कार्यरत आहेत. वाहनचालकांच्या एकूण 951 जागा मान्य आहेत.

त्यापैकी 428 पदे भरलेली असून, 533 जागा रिक्त आहेत. वाहने देखभाल-दुरुस्तीसाठी मोटार वाहन विभाग व कर्मशाळा विभागाकडे विविध तांत्रिक हुद्याच्या एकूण 386 जागा असून, त्यापैकी 126 पदे भरलेले आहेत. उर्वरित 260 जागा रिक्त आहेत. पालिकेकडील वाहनचालकांना अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वाहनांवर रोज दहा ते बारा तास काम करावे लागते. या वाहनांवरील बहुतांशी चालक पालिकेच्या कायम सेवेतील आहेत. पालिकेच्या वाहनात बिघाड झाल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते.

त्यासाठी संबंधित चालकाला जादा वेळ थांबून काम करावे लागते. वाहनचालकांकडून जादा वेळ काम करून घ्यावे लागत असल्याने, त्यांना जादा वेतन देणे कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक आहे. त्यानुसार सध्या चालकांना एका महिन्यात जादा कामासाठी 75 तासांचे वेतन दिले जाते. पालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याने जादा कामाच्या वेतनाची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे या जादा कामाचे वेतन देण्यात येणार्‍या तासांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. जादा कामांचे 25 तास कमी करून ही संख्या 50 वर आणण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्याला आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Back to top button