पुणे : सिलेंडर स्फोटात दाम्पत्य जखमी | पुढारी

पुणे : सिलेंडर स्फोटात दाम्पत्य जखमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरातील गॅस सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडताना गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत पती -पत्नी जखमी झाल्याची घटना धायरी येथील डिएसके विश्व परिसरात घडली. डिएसके विश्वजवळील गणेश नक्षत्र सोसायटीच्या 11व्या मजल्या वरील एका सदनिकेमध्ये शनिवारी (दि.17)सायंकाळी आठच्या सुमारास सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडताना गॅस गळती झाली. या वेळी घरातील पणतीमुळे घरात आग पसरली. या आगीत आरती राहुल साळवी (वय 37) जखमी झाल्या.

आरती यांना वाचवण्यासाठी धावलेले राहुल दिलिप साळवी (वय 40) यांनाही आगीची झळ लागली. येथील रहिवाशांनी घटनेची माहिती अग्निशामक दलास देऊन आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व तांडेल शिवाजी मुजूमले, जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे, विक्रम मच्छिंद्र, ओंकार लोखंडे, आदित्य मोरे आदींनी आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. घरातील इतर दोन सिलेंडर बाहेर काढत धोका दूर केला. दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button