भीमा -पाटस सहकारी साखर कारखाना सुरू झाला; ’यशवंत कारखान्याचे काय? | पुढारी

भीमा -पाटस सहकारी साखर कारखाना सुरू झाला; ’यशवंत कारखान्याचे काय?

उरुळी कांचन (ता. दौंड ); पुढारी वृत्तसेवा : शिंदे व फडणवीस सरकारने सहकार क्षेत्राला स्थैर्य लाभावे म्हणून दौंड तालुक्यातील भीमा -पाटस सहकारी साखर कारखाना सुरू केला. मग एकेकाळी सहकारी क्षेत्रातील राज्यात आदर्श असलेला व कोट्यवधीची मालमत्ता असलेला हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना अद्यापही बंद का, असा सवाल करीत तो तातडीने सुरू करावा, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सभासद संख्या व गाळप क्षमतेने मोठा असलेल्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आ. राहुल कुल यांच्या प्रयत्नातून शिंदे व फडणवीस सरकारने चालू केल्याबद्दलच्या निर्णयाचे शेतकरी बांधवांनी स्वागत केले. ’भीमा पाटस’ला जीवदान लाभले, तसे ’यशवंत’ला लाभू द्या, अशी मागणी होऊ लागली आहे.

हवेली तालुक्यातील यशवंत कारखाना गेली 11 वर्षे बंद राहिल्यानंतर शेतकर्‍यांच्या उसाच्या प्रश्नासहित कामगार व तालुक्याचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. उद्योग-धंदे बुडाले आहेत तसेच भूमिपुत्रांनी जमिनी विकण्याचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत कमी कर्जाचा बोजा असतानादेखील ही संस्था बंद राहिल्याने यामागे काय गुपिते आहेत प्रश्न कायम चर्चेला जात आहे.

किमान हमीभाव, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रनाला परवानगी, इथेनॉल निर्मतिीसाठी अनुदान प्रोत्साहन, दर महिन्याला साखर निर्यात कोटा, साखर निर्यात अनुदाने आदी निर्णयांनी ऊस उत्पादकांच्या हाती चांगला मोबदला मिळू लागला आहे. अशावेळी हवेलीतील शेतकर्‍यांना इतर खासगी कारखाने अथवा गुर्‍हाळे यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. हवेली तालुक्यात मुळा-मुठा व भीमा नदीपात्रात ऊस उत्पादन मोठे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची परवड होत आहे. ती परवड ’यशवंत’ सुरू झाल्याने थांबेल, अशी अपेक्षा आहे.

‘यशवंत’ इथेनॉलचा पायलेट प्रोजेक्ट व्हावा
सहकारात राज्यात आदर्श निर्माण करणारा यशवंत कारखाना इथेनॉलचा पायलेट प्रोजेक्ट म्हणून सुरू केल्यास निश्चितच इथेनॉल अभ्यासाचे मॉडेल या ठिकाणी उपलब्ध होईल. पुष्कळ जमीन, जवळची बाजारपेठ, वाहतुकीने सोईचे अंतर असल्याने ’यशवंत’चा इथेनॉल निर्मतिीचा विचार केल्यास सहकाराला इथेनॉलची जोड देण्यास यशवंत मॉडेलचा फायदा होईल, असे देखील मत येथे मांडले जात आहे.

Back to top button