चाकण : संतप्त नागरिकांचा नाशिक महामार्गावर रास्ता रोको | पुढारी

चाकण : संतप्त नागरिकांचा नाशिक महामार्गावर रास्ता रोको

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण वाहतूक कोंडीविरोधी कृती समितीतर्फे गुरुवारी (दि. 15) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, आप आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. शासनाच्या भूमिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत पदाधिकार्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आंदोलनामुळे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

खेड तालुका कृती समिती दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. दरम्यान, कृती समितीद्वारा दिलेल्या निवेदनाची दाखल केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून राज्य शासनाकडून पीएमआरडीएद्वारा खेड तालुक्यातील काही रस्ते व पूल यांना निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

केंद्र सरकार पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग व तळेगाव दाभाडे – शिक्रापूर नवीन राष्ट्रीय महामार्ग कामाबाबतच्या कामाचा सविस्तर आराखडा, काम पूर्ण करण्याबाबतची कालमर्यादा स्पष्ट करणार असल्याचे पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी या वेळी सांगितले. आंदोलन पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून संपल्याचे कृती समिती अध्यक्ष कुमार गोरे यांनी घोषित केले. सर्वपक्षीयांच्या या आंदोलनास चाकणकर जनतेनेदेखील मोठा पाठिंबा दिला.

या आंदोलनात अतुल देशमुख, कुमार गोरे, राम गोरे, जमीर काझी, अ‍ॅड. नीलेश कड, काळूराम कड, मुबीन काझी, राजन परदेशी, अनिल देशमुख, अनिल (बंडू) सोनवणे, अमृत शेवकरी, लक्ष्मण वाघ, चंद्रकांत गोरे, बाळासाहेब गायकवाड, विशाल नायकवाडी, भरत कानपिळे, संजय गोरे, दत्ता गोरे, अमोल जाधव, प्रीतम शिंदे, अशोक जाधव, नितीन जगताप आदी सहभागी झाले होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा
चाकण वाहतूक कोंडीविरोधी रस्ते विकासाबाबतचे निवेदन 15 दिवसांपूर्वी संबंधित विभागांना दिले होते. त्यावर कोणतेही ठोस आश्वासन न देण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले. रस्त्यांच्या कामांबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला आहे.

Back to top button