वाल्हे परिसरातील पिकांना वातावरणाने रडवले | पुढारी

वाल्हे परिसरातील पिकांना वातावरणाने रडवले

वाल्हे (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामातील पिकांना पावसाने झोडपले होते. आता रब्बी हंगामातील पिकांना वातावरणाने रडवले, अशी स्थिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांची झाली आहे. वातावरणातील बदलाने कांदापिकावर करपा रोगासह मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वाल्हे परिसरात शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. महागडी औषधे वापरूनही प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

चालू वर्षी खरीप पिकांच्या बाबतीत अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस अतिवृष्टीने शेतकरीवर्गाचे कंबरडे माडले होते. यामधून कसेबसे सावरत असताना आता, शेतकर्‍यांच्या आशा सगळ्या रब्बी हंगामातील पिकावर केंद्रित झाल्या होत्या. आर्थिक घडी बसविण्यासाठी परिसरातील शेतकरीवर्ग कांदा पिकांकडे वळला असून, भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा शेतक-यांना आहे.

सुरुवातीच्या काळात चांगले वातावरण राहिल्याने पिकाची वाढ जोमदार झाली आहे. मात्र, मागील आठवड्यापासून, वातावरणात झपाट्याने बदल होऊन सुरवातीला धूसर वातावरण व त्यानंतर सततच्या ढगाळ हवामानामुळे, व रविवारी हलका पाऊस यामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम होत आहे.

Back to top button