शहरात गोवरचा उद्रेक ! पाच बालके संशयित रुग्ण | पुढारी

शहरात गोवरचा उद्रेक ! पाच बालके संशयित रुग्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात भवानी पेठ परिसरात या वर्षातील गोवरच्या पहिल्या उद्रेकाची नोंद आरोग्य खात्याकडे झाली आहे. भवानी पेठेतील दोन बालके पॉझिटिव्ह, तर कोंढवा व रविवार पेठेत मिळून पाच बालके संशयित आढळली आहेत.  भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत लोहियानगर आणि कासेवाडी परिसरात 10 वर्षीय आणि 4 वर्षीय मुलामध्ये गोवरचे निदान झाले असून, पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. कोंढवा आणि रविवार पेठ परिसरातील पाच संशयित रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

रुग्णांचे अहवाल आता प्राप्त झाले असले तरी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. पॉझिटिव्ह बालकांपैकी एकाने  गोवरची लस घेतलेली नसून, दुस-याच्या लसीकरणाबाबत पालिकेला
माहिती मिळाली नाही.

असा केला जातो उद्रेक घोषित :

लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ’गोवरचे पाच संशयित रुग्ण आढळतात आणि त्यापैकी दोन रुग्ण गोवरबाधित आढळतात, तेव्हा तो उद्रेक म्हणून घोषित केला जातो. भवानी पेठेत मी स्वतः प्रत्येक घराला भेट दिली होती आणि लसीकरणाबाबत नागरिकांच्या शंका दूर केल्या होत्या. यापूर्वी नोंदवलेले आणि नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गोवरच्या संशयास्पद रुग्णांची नोंद झालेल्या सात मुलांना गेल्या आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गोवरचे निदान झालेल्या दोन मुलांची प्रकृती स्थिर आहे. महापालिका हद्दीत जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 11 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

किती झाले गोवरचे लसीकरण?

एप्रिल 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 दरम्यान पहिल्या गोवर-रुबेला लसीचे 62% उद्दिष्ट आणि दुसर्‍या डोसचे 49 टक्के उदिदष्ट पूर्ण करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांपैकी, 2020-21 मध्ये 97% मुलांना एमआरचा पहिला डोस आणि फक्त 67% मुलांना दुसरा डोस मिळाला. तर 2021-22 मध्ये, 91% मुलांना पहिला डोस मिळाला आणि 65% बालकांना एमआरचा दुसरा डोस मिळाला.

भवानी पेठेतील दोन मुलांमध्ये गोवरचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील सुमारे 2700 मुलांना पहिले दोन्ही डोस दिले असले तरी अतिरिक्त तिसरा डोस दिला जाणार आहे. सध्या महापालिका हद्दीत एक उद्रेक आणि दोन संशयित रुग्णांचे उद्रेक आढळून आले आहेत. जलद लसीकरणासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत. शुक्रवारपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, सर्वेक्षण युध्दपातळीवर करण्यात येत आहे.
– डॉ. आशिष भारती, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख

 

Back to top button