पुणे : ‘रिक्षा चक्काजाम’ला दुसर्‍या दिवशी प्रतिसाद | पुढारी

पुणे : ‘रिक्षा चक्काजाम’ला दुसर्‍या दिवशी प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रिक्षा चक्काजाम आंदोलनाला सोमवारी आणि मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी तर शहरात पुणे बंद होता. मात्र, तरी देखील संपात सहभागी न झालेल्या रिक्षाचालकांच्या रिक्षा शहरात धावताना दिसल्या. त्यांच्या संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षाचालकांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. त्याच रात्री पोलिसांनी रिक्षा संघटनेच्या काही रिक्षाचालकांना आरटीओ कार्यालयासमोरून हाकलले. तर काहींना ताब्यात घेतले. त्याचा निषेध करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकारी मंगळवारी स्वत: बंडगार्डन पोलिस ठाण्यात हजर झाले.

त्यामुळे मंगळवारी आरटीओ कार्यालयासमोर एकही रिक्षाचालक दिसला नाही. मात्र, घरात बसून शहरातील अनेक रिक्षाचालकांनी संपात सहभाग घेतला. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या तुरळक दिसली. रिक्षांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे स्थानक, एसटी स्टँड आणि अनेक ठिकाणी प्रवाशांना रिक्षा मिळाल्या नाही. त्यामुळे त्यांचे हाल झाले. त्यांची पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी धावपळ उडाली.

कृती समितीतील पदाधिकार्‍यांचे आमरण उपोषण

पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि आरटीओ कार्यालय येथून रिक्षाचालकांची हकालपट्टी केली आणि आंदोलन रोखले, याचा निषेध करण्यासाठी बाईक टॅक्सी कृती समितीतील पदाधिकार्‍यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.

सकाळी पोलिसांनी रस्ता केला मोकळा

सोमवारी रात्री असंख्य रिक्षाचालक संगम ब्रीजवर रिक्षा आडव्या लावून चक्का-जाम करून निघून गेले होते. त्यामुळे संचेती रुग्णालयाच्या दिशेने आरटीओकडे येणारा रस्ता पूर्णत: जाम झाला होता. त्यामुळे नागरिकांना या रस्त्याने जाता येत नव्हते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने येथील रिक्षा हटविल्या आणि रस्ता मोकळा केला.

 

Back to top button