पुणे : शिरसगाव काटा येथे मोटार अपघातात महिलेचा मृत्‍यू | पुढारी

पुणे : शिरसगाव काटा येथे मोटार अपघातात महिलेचा मृत्‍यू

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे रविवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास भरधाव मोटारीला अपघात झाला. या मोटार अपघातात महिलेचा मृत्‍यू झाला. तरुणांनी मोठ्या धैर्याने तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढले. यामुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकले. यात तीनजण जखमी झाले आहेत. मोटार अपघातात महिलेचा मृत्‍यू झाल्‍याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निर्वी-इनामगाव रस्त्यावर शिरसगाव काटा येथे भरधाव वेगाने जात असलेल्या चार चाकी वाहनाचा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, रस्ता सोडून वाहन पूर्णपणे उसात घुसले होते.

हा अपघात घडल्यानंतर नागरिकांना अपघाताची माहिती मिळाली; मात्र अपघातग्रस्त वाहन उसात दिसून येत नव्हते. जखमी आत गाडीत अडकल्याने आवाज येत नव्हता.

तितक्यात मदतीला आलेल्या तरुणांना मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने व गाडीत जखमी अडकल्याने अखेर लोखंडी साहित्याच्या मदतीने तरुणांनी आत अडकलेल्या जखमींची सुटका केली.

घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी धाव घेत तातडीने पाहणी केली. या मदतकार्यात पोलीस पाटील शितल गायकवाड, संतोष जाधव, एम. एस. कदम, सुत्रधार शिंदे , वैभव पवार, विकास केदारी, तेजस जाधव, कुलदिप शिंदे, राजकुमार काटे, स्वप्नील काटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या अपघाताची भीषणता इतकी होती की, रस्त्यापासून लांब अंतरावर उसात गाडी जाऊन थांबली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. या तरुणांनी धाडसाने दाखवलेल्या तत्परतेने तिघांना वेळेत उपचार मिळू शकले असून तरुणांचे कौतुक केले जात आहे.

Back to top button