हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्या यांचे आव्हान - पुढारी

हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्या यांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन : महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले. यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ”पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडलं थांबवले. ९ वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार आहे,” असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.

कोल्हापूरला जाण्यापूर्वी पुणे स्टेशन येथे सोमय्या यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले होते. मी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यांना वाटेतच कराडमध्ये पोलिसांनी रोखले.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वाजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड रेल्वे स्थानक ओगलेवाडी येथे उतरले. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले १२७ कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप, त्यावर मुश्रीफ यांनी १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा दिलेला इशारा आणि त्याचबरोबर सोमय्या यांच्याविरोधात मंत्री मुश्रीफ समर्थकांनी सुरू केलेली निदर्शने, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री मुश्रीफ व सोमय्या यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानांमुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

 

Back to top button