चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री! | पुढारी

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री!

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चन्नी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती दिली.

चरणजीत सिंग चन्नी सलग तीन वेळा चमकौर साहिबमधून आमदार झाले. 2007 मध्ये ते अपक्ष म्हणून विजयी झाले. यानंतर ते दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. ते 2015 ते 2016 पर्यंत पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. चन्नी हे रामदासिया शीख समुदायाचे आहेत.

2017 मध्ये, जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांना तंत्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री करण्यात आले. अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात उठावा करणाऱ्यांचे चन्नी यांनी नेतृत्व केले. पंजाबचे प्रश्न सोडवण्यासाठी अमरिंदरवर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणाले होते.

  • चन्नी यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत त्यांना राज्यपालांची भेट घेण्यासाठी घेऊन गेले. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदर सिंग रंधावाही त्यांच्यासोबत होते. येथे, सुखिंदर रंधावा आणि ब्रह्म मोहिंद्रा यांना उपमुख्यमंत्री बनवल्याच्या बातम्या प्राप्त झाल्या आहेत.दरम्यान, चरणजीत सिंग चन्नी यांच्या निवडीनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुखजिंदर सिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही,” असं त्यांनी म्हटलंय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर सहमती झाली होती, परंतु नवज्योत सिद्धू त्यांच्या नावाशी सहमत नव्हते. सिद्धू यांनी स्वत: ला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला होता, पण ते पंजाब काँग्रेसचे प्रमुख आहेत, त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावाला मान्यता दिली नाही. यानंतर सिद्धू यांच्या गटातून दलित मुख्यमंत्री बनवण्याबाबत चर्चा झाली.

 

Back to top button