पुरंदरचे आ. संजय जगतापांसह खासदारांचा ‘जलजीवन’वर डोळा : विजय शिवतारे यांचा आरोप | पुढारी

पुरंदरचे आ. संजय जगतापांसह खासदारांचा ‘जलजीवन’वर डोळा : विजय शिवतारे यांचा आरोप

सासवड; पुढारी वृत्तसेवा : पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अकार्यक्षमता मागच्या चार महिन्यांत अचानक गडद होऊ लागल्याने या जोडगोळीने आता जलजीवन योजनेच्या कामांवर दावा करीत भूमिपूजनाचा दिखावा मांडला आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुरंदर तालुक्यात जलजीवन योजनेतून केवळ 60 कोटी रुपये मिळाले होते.

पण, राज्यात सत्ताबदल झाल्यावर पुरंदर तालुक्याला जवळपास 300 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मिळाला. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्याचे नियोजन केल्याचे समजताच आमदार-खासदारांनी कुरघोडी करीत स्वतःच त्यावर डल्ला मारला, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात 2019 नंतर निधीचा ओघ अचानक आटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात केवळ बारामती आणि आंबेगाव या दोनच तालुक्यांना झुकते माप होते. पण, सत्ताबदल झाल्यानंतर शिवतारे यांनी अवघ्या 3 महिन्यांत सगळी उलथापालथ करून टाकली. विमानतळ, राष्ट्रीय बाजार, फुरसुंगी, उरुळी पाणीयोजना, समाविष्ट गावांचा टॅक्स प्रश्न, 19 टक्क्यांत पुरंदर उपसाचे पाणी, असे विषय एका झटक्यात त्यांनी संपवून टाकले.

पण, हीच गोष्ट आमदार-खासदारांनी का केली नाही, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊन या दोघांवर ’बिनकामाचे’ असा शिक्का बसला होता. त्यातच पुन्हा जलजीवन मधून मोदी आणि शिंदे सरकारने निधीचा पाऊस पाडल्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आधी ताव मारण्यासाठी या दोघांची धांदल उडाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये एवढा निधी या दोघांनाही कधी आणता आला नाही. यांचं सरकार गेल्यावर निधी खेचून आणण्याइतके कार्यक्षम हे कधीपासून झाले, असा सवाल आता लोक करीत आहेत, यासंबंधी शिवतारे यांनी वरील मोठा गौप्यस्फोट केला.

 

Back to top button