हिंजवडी : ‘नाईट लाईफ’वरून आयटीयन्स अन् स्थानिकांत दुही ! | पुढारी

हिंजवडी : ‘नाईट लाईफ’वरून आयटीयन्स अन् स्थानिकांत दुही !

सागर शितोळे : 

हिंजवडी : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हब म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी आयटी नगरीतील आयटीयन्सच्या फुल्ली फ्रिडम असलेल्या ‘नाईट लाईफ’ या जीवनशैलीमुळे आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांमध्ये दुही निर्माण झाल्याचे चित्र आहे.
‘एन्जॉय मूड’मधील जीवन शैली, पाश्चात्य संस्कृतीतील राहणीमान, रात्रीं-मध्यरात्रीपर्यंत चालणारी पब संस्कृती, पार्ट्या, धांगडधिंगा, बेशिस्त पार्किंग, सर्रास उघड्यावर फेकले (थ्रो) जाणारे कचर्‍याचे पार्सल. याशिवाय उच्चशिक्षित म्हणून स्थानिकांना अडाणी आणि कमी लेखण्याची आयटीयन्सची भावना तर आयटीयन्स उद्धट आणि बेशिस्त असल्याचा स्थानिकांचा समज अशा काही कारणांमुळे आयटीयन्स-स्थानिकांमध्ये कायम खटके उडतात. यामुळे ‘फुल टू धमाल’ करणार्‍या युवक, आयटीयन्स यांच्यात दुही निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हिंजवडी, माण परिसरात पीजी होस्टेलचे जाळे

यातूनच वाद, शिवीगाळ आणि किरकोळ हाणामारीच्याही घटना सातत्याने घडत असतात. आयटीमध्ये नोकरीनिमित्त शेकडो मैल दुरून देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या आयटीयन्स तरुण तरुणींची संख्या लाखात असून त्यांना राहण्याची सुविधा म्हणून हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, बावधन इत्यादी भागात पीजी हॉस्टेलसचे मोठे जाळे तयार झाले आहे. तर, फ्लॅट, रूम भाड्याने घेऊन ग्रुपने स्वतंत्र वास्तव्य करणार्‍या आयटीयन्सची संख्याही हजारोत आहे. या सर्व हॉस्टेल्सच्या इमारती अनेक ठिकाणी नागरी वस्त्यात असल्याने आयटीयन्स व स्थानिकांनी वारंवार तू-तू, मैं-मैं होते. त्यातच आयटीयन्स देखील आपण लोकवस्तीत राहत असल्याचे भान न ठेवता सार्वजनिक ठिकाणी बेधुंद व बेशिस्तपणे वागतात. त्यामुळे त्यांना लगाम घालणार कोण, असाही सवाल असून त्यांच्या वर्तणुकीचा येथील स्थानिक मुलां-मुलीवर विपरीत परिणाम होत असल्याचा राग स्थानिकांत आहे. यातूनच वादाची ठिणगी पडते.

यांना आवर घाला…

आयटीयन्सच्या रात्री उशिरापर्यंत होणार्‍या पार्ट्या आणि पब संस्कृतीमुळे आठवड्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात संगीताच्या तालावर झिंगेलेले तरुण-तरुणी अनेकदा रस्त्यावर देखील दिसतात. मद्यपान करून अनेकदा वावरणारे आयटीयन्स देखील असतात. यांना वेळीच आवर घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे प्रमाण वाढले

अलीकडे या आयटीयन्स मुला मुलींचे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यातूनच सार्वजनिक ठिकाणी व धार्मिक स्थळी अश्लिल चाळे करणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणे, बेशिस्त वाहने चालवून दोन्ही लेन जाम करणे, सार्वजनिक ठिकाणी तासन्तास गप्पा मारत उभारून वाहतूक कोंडी करणे, अश्लिल हाव-भाव करणे, तसेच हॉस्टेलचे किंवा रुमचे भाडे न देता पळ काढणे, महिनोन्महिने मेसचे बिल न भरणे उद्धट वर्तन व अरेरावीची भाषा करणे, रूमवर मित्र जमवून पार्ट्या करणे मध्यरात्री दारू पिऊन आरडाओरडा, धांगडधिंगा करून इतरांना त्रास देणे, नशेत भांडणे करणे अशा अनेक कारणांमुळे आयटीयन्स आणि स्थानिकांत कायम निखारा आहे.

Back to top button