पाटस : ग्रामदैवत भानोबा देवाचे कोयाळीकडे प्रस्थान | पुढारी

पाटस : ग्रामदैवत भानोबा देवाचे कोयाळीकडे प्रस्थान

पाटस; पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत श्री भानोबा देवाला कोयाळी (ता. खेड) ग्रामस्थांच्या हाती देताना कुसेगावातील भाविक, ग्रामस्थ भावनिक झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याप्रसंगी भानोबाचं चांगभलं! चा जयघोष करण्यात आला. रस्त्यावर रांगोळीची सजावट करण्यात आली होती.

काहींनी पुष्पवृष्टी केली. तरुणांनी ढोल-ताशे वाजवत गुलाल उधळून भानोबाला निरोप दिला. कुसेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत भानोबा देवाचा यात्रोत्सवाचा कालावधी पूर्ण करून गावातून रविवारी (दि. 11) दुपारी श्री भानोबा देव मंदिरातून बाहेर पडले. कुसेगाव ते भोसलेवाडी येथील शिवेवर 5 वाजता देव कोयाळी ग्रामस्थांच्या हाती देण्यात आले. कोयाळीकडे प्रस्थान करीत असताना भोसलेवाडी येथे सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी देवाचे स्वागत केले. देवाचा पहिला मुक्काम भोसलेवाडीतील मंदिरात करण्यात आला.

यात्रेला चार लाखांहून अधिक भाविक येत असल्याने ग्रामस्थांनी विविध कामांची जबाबदारी वाटून दिली होती. पाणी व्यवस्था माजी उपसरपंच मणेश शितोळे, लाईट व्यवस्था उद्योजक मोहन शितोळे, वाहतूक कोंडी प्रताप शितोळे, स्वच्छता श्री भानोबा तरुण मंडळ व भक्त, देव-दानव युद्धभूमी येथे भक्तांना देवाबरोबर युद्ध खेळण्याच्या मैदान सपाटीकारण करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांततात्या शितोळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.

यात्रेत वाद-विवाद हे होऊ नये म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरद शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी काम पाहिले. भाविकांना कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश भोसले, मनोज शितोळे, उत्तम रुपणवर, हनुमंत शितोळे आदींनी मार्गदर्शन केले.

कुस्ती आखाड्याचे काम प्रमोद शितोळे, विनोद रुपणवर, गणेश शितोळे यांनी पाहिले. पंजाब केसरी रिंकू सिंग व महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यातील लढतीत योगश पवार विजयी झाला. त्याला 51 हजारांचा इनाम देण्यात आला. शर्मिला मनेश शितोळे यांनी ही माहिती दिली. विजूसिंह शितोळे, दादासाहेब शितोळे, नीलेश शितोळे, नवनाथ रुपणवर, विनोद शितोळे, संतोष शितोळे, योगेश रुपणवर, संतोष भोसले, विकास शितोळे, बाळासाहेब गायकवाड, बाप्पू चव्हाण यांनी यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

भाविकांनी केले दै.‘पुढारी’चे कौतुक
यात्रेच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत दैनिक ’पुढारी’ने दिलेल्या बातम्यांचे भाविकांनी कौतुक केले.

यात्रेच्या कालावधीत नवीन मंदिर जीर्णोद्धाराचे काम चालू असल्याने कोयाळी येथील उदयोगपती राजू गायकवाड यांनी 11 लाख रुपयांची देणगी दिली. आलेल्या भाविकांनी 18 लाख 65 हजार रुपयांची रोख स्वरूपाची देणगी मंदिर जीर्णोद्धारसाठी दिली.

                                  शर्मिला मणेश शितोळे, सरपंच, कुसेगाव ग्रामपंचायत.

Back to top button