पळसदेव : ’उजनी’वर स्थलांतरित मत्स्य घार दाखल | पुढारी

पळसदेव : ’उजनी’वर स्थलांतरित मत्स्य घार दाखल

प्रवीण नगरे

पळसदेव : मूळ इंग्लंडमध्ये वास्तव्याला असणारी मत्स्य घार स्थलांतरित पक्षी म्हणून उजनी धरणाच्या पाणलोटात दरवर्षाप्रमाणे येऊन दाखल झाली आहे. या घारीला मोर घार, मीन घार, मासा घार, काकण घार, मीनाखाई इत्यादी नावांनीही ओळखतात. उजनीच्या पाण्यात मुबलकपणे आढळणारा चिलापी मासा हे या घारीचे आवडते खाद्य आहे. या शिकारी पक्ष्याचे इंग्रजीत ऑस्प्रे (जीिीशू) असे नाव आहे.

या घारीचे डोके, मान व छाती पांढरीशुभ्र असून, संपूर्ण शरीराचा पृष्ठभाग गडद उदी रंगाचा असतो. चोच दणकट व अणकुचीदार आणि नखे तीक्ष्ण असतात. पंख खूप मोठे असून, दोन्ही पंखांचा विस्तार सुमारे पाच ते सहा फूट इतका होतो. मत्सप्रिय असलेली ही घार दिवसभर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत माशांना लक्ष्य करते.

किलो-दोन किलो वजनाचे मासे लीलया उचलून नेण्याची क्षमता या घारीमध्ये आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अर्धवट बुडालेले विजेचे खांब, जुन्या इमारती, वठलेल्या झाडांवर विश्रांती घेत दिवसभर चिलापी माशांना लक्ष्य करतात. धरच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेव डाळज, कुंभारगाव, टाकळी, कोंडार चिंचोळी, कात्रज इत्यादी गावांच्या शिवारात सध्या ही घार वावरताना नजरेस पडते.

मूळ इंग्लंडची असलेली ही घार उन्हाळ्यात हिमालय व काश्मीरच्या खोर्‍यातील उत्तुंग झाडांच्या फांद्यांवर घरटी साकारून पिलांना जन्म घालते. नवजात पिलांना घेऊन ब्रिटनकडे परततात. पुन्हा हिवाळ्यात भारतीय उपखंडात हिवाळी पाहुणे येऊन दाखल होतात. पुढे चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये वंशाभिवृद्धीसाठी हिमालयामध्ये निघून जातात.
                                                               डॉ. अरविंद कुंभार,
                                                             ज्येष्ठ पक्षिअभ्यासक

Back to top button