पुणे : शहरातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे घेणार बैठक | पुढारी

पुणे : शहरातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे घेणार बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवासी मिळकतींची 40 टक्के कर सवलत पुन्हा सुरू करण्यासह शहराला वाढीव पाण्याचा कोटा मिळावा, ससूनच्या धर्तीवर हडपसर भागात नवीन रुग्णालय, समाविष्ट गावांच्या विकासासाठी हजार कोटींचे अनुदान अशा वेगवेगळ्या विषयांवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील अधिकार्‍यांची बैठक घेणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी दिली. भानगिरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या वेगवेगळया समस्या तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्याची विनंती करत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

याबाबत भानगिरे म्हणाले की, शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात मिळकत कर सवलत, वाढीव पाणी कोटा, शहराची वाहतूक समस्या, मुळशी धरणातून शहरासाठी वाढीव 5 टीएमसी पाणी, पीएमपी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासह हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांचे निवेदन देण्यात आले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून तातडीनं या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयास दिल्या आहेत. तसेच या प्रश्नांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या जाणार असून लवकरच मुंबईत ही बैठक घेतली जाणार असल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले.

Back to top button