पुणे : सायबर चोरट्याचा गंडा! बँक खात्यावर ताबा मिळवत कर्जही मिळविले | पुढारी

पुणे : सायबर चोरट्याचा गंडा! बँक खात्यावर ताबा मिळवत कर्जही मिळविले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ओला कॅबचे पेमेंट करताना चुकून डेबिट कार्ड पेमेंटचे बटण दाबले गेले. ही चूक एका बीएसएनएलच्या अधिकार्‍याला भलतीच महागात पडली. त्याच्या बँक खात्यावर सायबर चोरट्याने 14 लाख 79 हजारांचे कर्ज काढून 3 लाख 94 हजार परस्पर काढून घेतले. धक्कादायक म्हणजे ओटीपी सांगू नका, असे म्हणून एनी डेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 54 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बीएसएनएलमध्ये अंदमान निकोबर येथे काम करतात. ते सुट्टी घेऊन हडपसर येथे आले होते. त्यांनी स्टेशनवरून ओला कॅब बुक केली होती. घरी आल्यावर कॅबचे पेमेंट करीत असताना चुकून त्यांच्याकडून डेबिट कार्ड पेमेंटचे बटण दाबले गेले. त्यांनी ते कॅन्सल करून कॅब चालकाला रोकड दिली. यानंतर त्यांना एक मेसेज आला, त्यामध्ये त्यांना डेबिट कार्डमधून गेलेले 299 रुपये कंपनीकडून परत देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गुगलवरून हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने त्यांना एनी डेक्स अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून खबरदारी म्हणून कोणासही ओटीपी सांगू नका, असे सांगितले.

यानंतर त्यांच्या खात्यात 299 रुपये जमा झाले. यानंतर त्यांचे डेबिट कार्ड ब्लॉक होऊन सायबर चोरट्याने त्यांच्या बँकेची सर्व माहिती काढून घेतली. त्याने स्वत:चा मोबाईल नंबर त्यांच्या बँक खात्यास जोडला. यानंतर परस्पर 14 लाख 79 हजार रुपयांचे डिजिटल लोन त्यांच्या बँकेतून मंजूर करून घेतले. यातील 3 लाख 94 हजार रुपयांची रक्कम त्याने तातडीने स्वत:च्या खात्यात वर्ग करून घेतली.

यासंदर्भातील एकही मेसेज फिर्यादीला आला नाही. दरम्यान, दोन दिवसांनी फिर्यादी बँकेत पासबुक भरण्यासाठी गेले असता, त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधून उर्वरित रक्कम सायबर भामट्याच्या खात्यात वर्ग होण्यापासून थांबवली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.

जाळ्यात अडकू नका
अनेकदा आपण एखाद्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करण्यासाठी गुगलवर ऑनलाईन सर्च करतो. तेथे सायबर चोरट्यांनी नामांकित कंपन्याच्या नावाने बनावट ग्राहकसेवा केंद्राचे संपर्क क्रमांक अपलोड करून ठेवलेले असतात. नेमके आपण तेथेच फसतो आणि खात्री न करता सायबर चोरट्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकून संपर्क करतो. पुढे तुमचा विश्वास संपादन करून चोरटे तुमच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती चोरी करून तुम्हाला आर्थिक गंडा घालतात.

Back to top button