…आता शरीरातील प्रोटिन बदलही कळणार; आयसरच्या संशोधकांचे यश | पुढारी

...आता शरीरातील प्रोटिन बदलही कळणार; आयसरच्या संशोधकांचे यश

पुणे : मानवी शरीरात अतिशय सूक्ष्म मशिनच्या रूपात काम करणार्‍या प्रोटिनची घनता व कमी कार्यक्षमता मोजणे आता सहज शक्य होणार आहे. हे संशोधन भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अर्थात आयसरच्या डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक संशोधकाच्या टीमने केले आहे. प्रोटिनची घनता व लवचिकता मोजमापासाठी एक अनोखे उपकरण विकसित केले आहे.

प्रोटिनच्या मोजमापासाठी जगभर संशोधन सुरू असताना पुण्यातील आयसरच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनांची नोंद जर्नल ऑफ फिजिकल केमिस्ट्री लेटर्समध्ये घेण्यात आली असून, ’डायरेक्ट एंड सिमुल्टेनियस मेजरमेंट ऑफ द स्टिफनेस एंड इंटरनल फ्रिक्शन ऑफ द सिंगल फोल्डेड प्रोटिन’मध्ये हा अहवाल प्रकाशितही झाला आहे.

मानवी शरीरात प्रोटिन अतिसूक्ष्म स्वरूपात काम करीत असतात. मात्र, त्यांची घनता व हलकी कार्यक्षमता कशी मोजावी, ही प्रत्येक संशोधकासमोर मोठी अडचण होती. म्हणून जगभरातील संशोधक काम करीत होते. मात्र, डॉ. शिवप्रसाद पाटील यांच्या सूर्यप्रताप देवपा, शत्रुघ्न सिंह राजपूत, आदर्श कुमार या संशोधक टीमने ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोप डिवाइसची संवेदनशीलतेला एक हजार पटीने वाढवत प्रोटिनची घनता व कमी कार्यक्षमता मोजण्यामध्ये यश मिळवले.

उपकरणामुळे बदल कळतील..,..
शरीरात प्रोटिन हे अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून कार्य करते. मधुमेह व हृदयाशी संबंधित अनेक रोग हे अनुवंशिक असतात. म्हणूनच शरीरातील जीन्समधील बदलाच्या आधारावर रोगांची माहिती ठरवली जाते. तसेच, एक स्वस्थ व्यक्ती दुसरा रोगग्रस्त व्यक्ती यांची तुलना करून निष्कर्ष काढला जातो. जीन्समध्ये अंततः प्रोटिन बनवण्याची पूर्ण माहिती गोळा केली जाते.

यामध्ये ज्या काही उणिवा जाणवतात त्या प्रोटिनची संरचना आणि कार्य करण्याची पद्धत कशामुळे बिघडते, हेदेखील तपासले जाते. याकरिता प्रोटिन्समध्ये होणार्‍या बदलांवर लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते. याकरिता प्रोटिन्सची घनता व कमी कार्यक्षमतेलाही समजून घेणे गरजेचे असते. आत्तापर्यंत एक प्रोटिनचा अणू त्याला संकुचित करणे, हे कठीण कार्य होते. मात्र, या संशोधनानंतर प्रोटिन्समधील घनता व कमी कार्यक्षमता मोजणे सोपे झाले आहे.

शरीररचना विज्ञान व उपचार क्षेत्रात उपयुक्त
भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थानच्या डॉ. शिवप्रसाद पाटील यांनी सांगितले, की या संशोधनामुळे प्रोटिनबाबत अभ्यास करणे शक्य झाले आहे. प्रोटिन्समध्ये त्याच्या आकारात काय बदल झाला, त्यांची घनता व कमी कार्यक्षमतेतील बदलाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. हे संशोधन शरीर रचना विज्ञान व उपचार क्षेत्रात उपयोगी ठरणार आहे. सध्या या संशोधनावर थांबलेलो, आणखी पुढे काय संशोधन करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे.

Back to top button