पुणे : जिझिया करातून मुक्तता : विजय शिवतारे | पुढारी

पुणे : जिझिया करातून मुक्तता : विजय शिवतारे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेत ज्या अर्थी ही गावे समाविष्ट झाली होती, त्याची पूर्तता झालेली नाहीच. तर दुसरीकडे जिझिया करामुळे उरुळी देवाची, फुरसुंगी गावांतील नागरिक हैराण झाले होते. परंतु आता ही गावे पालिकेतून वगळण्यात आली असून, जिझिया करातून मुक्तता झाली आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवतारे म्हणाले, शहरालगतची अकरा गावे 2017 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांचा समावेश होता. त्यावेळी या भागात विकास होईल, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही महापालिकेने साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडविलेला नाही. मी मंत्री असताना दोन गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योजना मंजूर केली होती. त्या योजनेचे कामही गावे महापालिकेत जाण्यापूर्वी सुमारे 80 टक्के झाले होते. परंतु आजही काम पूर्ण झालेले नाही. परिणामी सुमारे 130 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी उपस्थित महापालिकेचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे समोर आले. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केलेल्या विकास आराखड्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लगतची 18 गावे विकास केंद्र आहेत. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यास समन्यायी पद्धतीने काम होऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली, असे शिवतारे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनेला 25 ते 30 कोटी रुपये देऊ शकले नाहीत
बारामतीच्या बसस्थानकाला 200 कोटी रुपये, तर बारामती नगरपालिकेला 240 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, उरुळी देवाची, फुरसुंगी गावांच्या पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया निधी दिलेला नाही, अशी टीका शिवतारे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. शिवतारे म्हणाले, की 11 पैकी उरुळी देवाची, फुरसुंगी ही दोनच गावे पूर्णतः पालिकेत आली होती. उर्वरित नऊ गावे अंशतः पालिकेत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या दोनच गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Back to top button