पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर इथोपियाचे वर्चस्व | पुढारी

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर इथोपियाचे वर्चस्व

पुणे : 36 व्या पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या संघाचे वर्चस्व राहिले. भारताचा कालिदास हिरवे हा एकूण स्पर्धेत चौथा, तर भारतीयांमध्ये पहिला आला. त्याचबरोबर महिलांच्या अर्ध-मॅरेथॉनमध्ये भारताची रेश्मा केवटे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

कै. बाबूराव सणस मैदानाच्या बाहेरून यंदाच्या पुणे मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. मॅरेथॉनचे उद्घाटन ’सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’चे संयोजक फिरोज अहमद खान, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुणे मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, रेस डायरेक्टर रोहन मोरे, गुरबन्स कौर, सुमंत वाईकर,

माजी आमदार दिप्ती चवधरी, सचिन आडेकर यांसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धेचे पारितोषिक वितरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, रोहन मोरे, ‘सरहद’चे संजय नहार, माजी उपमहापौर आबा बागुल, हर्षल निकम आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये (42 किलो मीटर) पुरुष गटात इथिओपियन धावपटूंनीच निर्भेळ यश संपादन केले, तर महिला गटात इथिओपियन धावपटूने प्रथम बाजी मारली, पण दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर भारतीय धावपटूंनी हक्क सांगितला. अर्ध मॅरेथॉनमध्ये (21 किलोमीटर) पुरूष गटात इथिओपियन, तर महिला गटात भारतीय धावपटू सरस ठरले. या स्पर्धेत लेट तेस्फाये गुटेटाने 2 तास 17 मिनिटे 27 सेंकद वेळेसह पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन जिंकली. महिला गटात डेरार्टू केबेडेने 2 तास 47 मिनिटे 2 सेंकद वेळेसह बाजी मारली.

अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात शुन्मेसा इथिचा हा 1 तास 5 मिनिटे 2 सेंकद वेळेसह विजेता ठरला, तर महिलांत हिंदुस्थानची मराठमोळी रेश्मा केवटेने 1 तास 19 मिनिटे 54 सेंकद वेळेसह प्रथम क्रमांक पटकाविला. देशातील सर्वात जूनी मॅरेथॉन असलेली पुणे मॅरेथॉन ही डिसेंबरमध्ये पहिल्या रविवारी घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये ही स्पर्धा खंडीत झाली. त्यानंतर फेब—ुवारी 2022 मध्ये 2021ची मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली होती.

मुख्य स्पर्धेला सुरुवात होताच इथिओपियाच्या धावपटूंनी अपेक्षेप्रमाणे मुसंडी घेतली. सुरुवातीला 13 धावपटूंचा जथ्था सोबत धावत होता. दांडेकर पुलावरून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर विठ्ठल मंदिरापर्यंत हा जथ्था विखुरला गेला. यातील दोन धावपटू मागे पडले. वडगाव पूलापर्यंत पुन्हा यातील एक-एक धावपटू मागे पडत गेल्याने आघाडीच्या जथ्थ्यात केवळ तीनच धावपटू राहिले. यात उर्गा अब्दू केबेबे आघाडीवर होता. वांजळे पुलावर 8 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे तिघे धावपटू एकमेकांचा अंदाज घेत धावत होते. मात्र, केबेबेने आपली आघाडी आणखी वाढविली होती.

नांदेड सिटीतून यू टर्न घेईपर्यंत हेच चित्र कायम होते. संतोष हॉल ओलांडल्यानंतर 20 किलोमीटरपर्यंत अब्दू केबेबेने आपली आघाडी टिकवून ठेवली होती. पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या धावपटूंना सिंहगड रोड ते नांदेड सिटी मार्गावर दोन फेर्‍या मारायच्या असल्याने इतर गटातील धावपटूही मार्गावर दिसू लागल्याने संपूर्ण मार्गच मॅरेथॉनमय झाला होता.

परतीच्या मार्गावर अखेरच्या साडेतीन ते चार किलोमीटरच्या टप्प्यात लेट तेस्फाये गुटेटाने अब्दू केबेबेला पिछाडीवर टाकत धावण्याचा वेग वाढविला. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या उर्जेचा वापर करत गुटेटाने अब्दू केबेबे पुढे जाणार नाही, याची खबरदारी घेत एका मिनिटांच्या फरकाने ही शर्यत जिंकली.

…असा आहे स्पर्धेचा निकाल
पुरुष पूर्ण मॅरेथॉन ः लेट तेस्फाये गुटेटा (इथिओपिया) – 02:17.27, उर्गा अब्दु केबेबे (इथिओपिया) -02:18.17, यिबेगेटा टेलेल्कु झेंगेटा (इथिओपिया) -02:20.23. महिला पूर्ण मॅरेथॉन ः इशेतू केबेडे (इथिओपिया) – 02:47:02, ज्योती गवते (भारतीय) – 03:10:46, डिस्केट डोलमा (भारतीय) – 03:26:18. पुरुष अर्ध मॅरेथॉन ः हुन्मेसा हिलू इथिचा (इथिओपिया) – 01:05:16, इसाक किहारी कामिरी (इथिओपिया) – 01:05:21, किफेले केफॅलेव सिलेशी (इथिओपिया) – 01:05:47. महिला अर्ध मॅरेथॉन ः रेश्मा केवटे (भारतीय) – 1:19:54, मेलका किडने (इथिओपिया) – 1:22:16, निगाटू बासाझीन (इथिओपिया) – 1:22:36. पुरुष 10 किलो मीटर ः नवीन हुडा – 00:30:58, उत्तम पाटील – 0:31:09, शुभम भंडारे – 0:31:15. महिला 10 किलो मीटर ः वृषाली उत्तेकर – 40.24, अर्चना आढाव – 40.55, शिवानी चौरसिया – 41.18. पुरुष 5 किलो मीटर ः अतुल बर्डे – 15.56, गणेश आठवले – 16.06, माऊली वैराळे – 16.17. महिला 5 किलो मीटर ः यमुना लडकत – 19.52, वेदश्री लोणारी – 20.02, खुशी हसे – 20.1. पुरुष व्हीलचेअर 3 किलो मीटर ः पैैयाज आलम – 16.27, अनिल कच्छी – 16.52, प्रेमिंसग पटवाल – 17.17. महिला व्हीलचेअर 3 किलो मीटर ः भाग्यश्री माझीरे – 20.02, रीना गुप्ता – 20.59, पूनम उमप – 26.31.

आजच्या मॅरेथॉनमध्ये खूप छान वाटले. गेल्या 12 वर्षांपासून सराव करीत असून, यापूर्वी 10 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये धावलेले आहे. गेल्या वर्षी ही या मॅरेथानमध्ये सहभागी झाले होते. सातार्‍यातील म्हसवड येथील रहिवासी असून माण फाउंडेशनच्या वतीने आमच्या शेताजवळच ट्रॅक तयार केला होता. त्यावर सातत्याने सराव करीत होते. यापूर्वी अरविंद चव्हाण यांच्याकडे प्रशिक्षण घेत होते तर आता मंजुळा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. आत्तापर्यंतची माझी 1.17 हे चांगली वेळ नोंदविलेली आहे. आगामी काळात एशियन स्पर्धेतील 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे.

                                           – रेश्मा केवटे, महिला हाफ मॅरेथॉनची विजेती

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये प्रथमच सहभागी झालेलो आहे. गेल्या पाच वर्षांपासून धावण्याचा सराव करीत असून, दोन वर्षांपूर्वी 10 किलोमीटर रनमध्ये सहभागी झालो होतो. यावर्षीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 2.17 मिनिटांची चांगली वेळ नोंदवली असून, वातावरणाचा ही चांगला फायदा झाला. काही ठिकाणी रस्त्यातील स्पीडब—ेकरचा त्रास जाणवला आहे.

                          – लेट तेस्फाये गुटेटा, पुरुष पूर्ण मॅरेथॉनचा विजेता, इथोपिया

सातारा तालुक्यातील मांढरदेवी येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासूनच पुण्यातच सरावाला आहे. यापुर्वीही पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावलो आहे. ही माझी दुसरी स्पर्धा असून 2.22 ची वेळ नोंदविली आहे. माझी काहीच तयारी झाली नव्हती. त्यामुळे चांगली वेळ नोंदविता आली नसल्याने स्पर्धेत चौथा क्रमांक तर भारतीयांमध्ये पहिला क्रमांक मिळविता आला. मॅरेथॉनमध्ये वातावरणाचा फायदा झाला. मात्र, रस्त्यावरील अनेक स्पीड ब—ेकरमुळे 35 किलोमीटरनंतर माझ्या पायांमध्ये वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे माझी स्पीड कमी झाल्याने चांगली वेळ नोंदविता आली नाही.

                                                        – कालिदास हिरवे,
                                   पुरुष पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय गट विजेता

Back to top button