मोशीत इंद्रायणीच्या फेसयुक्त पाण्यामुळे पसरली दुर्गंधी | पुढारी

मोशीत इंद्रायणीच्या फेसयुक्त पाण्यामुळे पसरली दुर्गंधी

मोशी : पुढारी वृत्तसेवा :  मोशी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याला पांढरा शुभ्र फेसातून दुर्गंधी येत असून रासायनिक दर्प जाणवत आहे.
नदीच्या प्रदूषणात वाढ झाली असून अद्याप जलपर्णी नसली तरी पात्रात रासायनिक फेस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या फेसाला दुर्गधी येत असल्याने नदीच्या काठावर राहत असलेल्या सदनिकांमधील नागरिकांचे जिणे मुश्किल झाले आहे. रोज सायंकाळी उग्र वास हवेत मिसळत असून या वासामुळे श्वसनाचे त्रास होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

सायंकाळी नागरिकांना दारे, खिडक्या लावून घरात बसावे लागत आहे. डास व चिलटांचा प्रादुर्भाव वाढत आहे.डासांचा उपद्रव वाढल्याने विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. मोशी येथील बंधार्‍यानजीक हे फेसयुक्त तवंग दिसत आहेत. मोशी भागात सध्या मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत असून नागरिकांचा या भागात राहण्याचा ओढादेखील दिसून येत आहे मात्र राहण्यास आल्यानंतर उग्रवास रोजचा झाल्याने त्यांची प्रशासना विरोधात नाराजी वाढत आहे. यावर तोडगा काढला जावा, अशी मागणी होत आहे. भाडेकरू एक वेळ जागा बदलू शकतात. मात्र स्थानिकांचे रोजचे मरणे झाले असून, याच उग्रवासासोबत त्यांना आयुष्य काढावा लागत असल्याची अन पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हे दिवस भोगावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

एकंदरीतच जलपर्णी आणि प्रदूषित पाणी यामुळे नदीचा कायमचाच श्वास गुदमरला आहे. मात्र, आता नागरिकांनादेखील जिणे मुश्किल झाले आहे.

रामझरा ठरतोय हॉटस्पॉट
इंद्रायणी नदीत सर्वधिक रासायनिक आणि प्रदूषित पाणी पालिका हद्दीतील कुदळवाडी येथील ओढ्यातून थेट इंद्रायणी नदीत मिसळत आहे. प्रक्रिया न करताच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी नदीत मिसळत असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Back to top button