शिरापूरचे तलाठी कार्यालय धूळखात; दोन वर्षांपासून इमारत बांधून तयार | पुढारी

शिरापूरचे तलाठी कार्यालय धूळखात; दोन वर्षांपासून इमारत बांधून तयार

देऊळगाव राजे; पुढारी वृत्तसेवा : शिरापूर (ता. दौंड) येथील तलाठी कार्यालय तब्बल दोन वर्षांपासून धूळखात पडले आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही इमारत बांधली आहे. यामागील मुख्य उद्देश गावातील लोकांची कामे लवकर आणि गावातच व्हावीत हा आहे. त्या ठिकाणी तलाठी यांची राहण्याची सोय केली आहे; मात्र तलाठी कार्यालयाचा कारभार देऊळगाव आणि दौंड येथून चालवला जातो. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे.

सातबारा किंवा शेतीची कुठलीही कागदपत्रे लागली तर शेतकर्‍यांना देऊळगाव आणि दौंड येथे चकरा माराव्या लागतात. यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. शिरापूर येथे भीमा नदी आहे. या ठिकाणी वाळूचोरीदेखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वाळूचोरांना अडचण होऊ नये म्हणून तर शिरापूर येथील तलाठी कार्यालय वापरले जात नाही ना, असा सवाल शेतकरीर्‍यांना पडला आहे.

शिरापूर येथील तलाठी कार्यालय आगामी 15 दिवसांमध्ये सुरू करावे, अन्यथा न्याय मार्गाने आंदोलन केले जाईल.
                                                 केशव काळे, माजी सरपंच, शिरापूर

मी सध्या दौंड येथे राहत असून रोज कामासाठी गावात येत आहे. तलाठी कार्यालयाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्याच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे. हे कार्यालय दुरुस्त झाल्यानंतर ते त्वरित सुरू केले जाईल.

                                                      दुष्यंत पाटील, तलाठी, शिरापूर

Back to top button