वाहनांच्या पुन्हा दोन किलोमीटर रांगा; चांदणी चौकातील वाहतूक कोंडी हटेना | पुढारी

वाहनांच्या पुन्हा दोन किलोमीटर रांगा; चांदणी चौकातील वाहतूक कोंडी हटेना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील प्रकल्पाचे रेंगाळलेले काम, अर्धवट स्वरूपाचे डांबरीकरण, त्यातच गर्दीच्या वेळी चारचाकी वाहन रस्त्यावर बंद पडल्याने शनिवारी चांदणी चौकापासून दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अतिशय गाजावाजा करीत चांदणी चौकातील पूल ऑक्टोबरच्या प्रारंभी पाडण्यात आला. त्याला दोन महिने झाले. तेव्हा दिवाळीनंतर वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही ती स्थिती आलेली नाही. रस्त्याच्या कडेचा पाषाण फोडण्यासाठी नियंत्रित स्फोट केले जातात. त्यावेळी दिवसाआड अर्धा ते एक तास वाहतूक थांबविली जाते किंवा संथगतीने सुरू ठेवली जाते. तेथे वाहतूक पोलिस नियुक्त केले असले, तरी रस्त्यावरील अपुर्‍या जागेमुळे कोंडी टाळता येत नाही, अशी स्थिती आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पूल पाडला, त्या ठिकाणचे डांबरीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. त्यातच महामार्गावर आज दुपारी एक बसगाडी बंद पडली. त्याचवेळी चांदणी चौकाजवळील वेदविहारजवळ एक चारचाकी गाडी बंद पडली. वाहतूक पोलिसांनी प्रकल्प राबविणार्‍या कंपनीच्या रेस्क्यू व्हॅनच्या साह्याने बसगाडी रस्त्याच्या कडेला हलविली.

दरम्यानच्या काळात वाहनांच्या रांगा लागल्या. दुचाकी वाहने आणि लहान आकाराच्या कार बावधनच्या दिशेने वळाल्या. त्यामुळे, त्या अरुंद रस्त्यावर कोंडी झाली. बावधन ते चांदणी चौक, तसेच कोथरूड डेपोपासून चांदणी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारची सुटी असल्यामुळे मुळशीकडे फिरायला जाणार्‍या वाहनांचे प्रमाणही मोठे होते.

वेदविहारजवळ मोटार बंद पडल्यामुळे कोथरूड डेपोपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांदणी चौकात पूल पाडलेल्या ठिकाणचा रस्ता समतल नाही. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तेथे रस्त्याचे समतल डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधून सुटणारी वाहने, तसेच मुंबईहून सातार्‍याकडे जाणारी वाहने चांदणी चौकात आल्यानंतर तेथे मोठी गर्दी होते. तेथून कोथरूडला जाताना बॉटल नेक तयार होतो. ही कोंडी हटवण्यासाठी कोथरूडला उतरणार्‍या रस्त्याची रुंदी वाढविण्याची गरज आहे. वाहनांची संख्या आणि मुंबईच्या बाजूने पुण्याच्या बाजूला येणार्‍या वाहनांची संख्या पाहता मागे वाहतूक कोंडी होणे हे अनिवार्यच आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिस असतात, परंतु पुढे अरुंद रस्ता असल्याने वाहतूक पोलिसही हतबल झाले आहेत.

कोथरूडला जाण्यासाठी तीन लेन
कोथरूड डेपोकडे जाणार्‍या रस्त्याच्या तीन लेन येत्या चार-पाच दिवसांत सुरू करण्यात येतील. त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button