पुणे : गोवरच्या उद्रेकामुळे आरोग्य विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर | पुढारी

पुणे : गोवरच्या उद्रेकामुळे आरोग्य विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. राज्यातील गोवरचा उद्रेक वाढत आहे. मंगळवारी पिंपरीतही गोवरचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला असून, तज्ज्ञांची बैठक, घरोघरी सर्वेक्षण, लसीकरणाबाबत वेगाने हालचाली केल्या जात आहेत. ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे, त्या भागामध्ये नियमित लसीकरणाच्या नेहमीच्या डोसव्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी.

ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा भागांमध्ये लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गोवरबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर शासकीय विभागांतूनही मदत मिळावी. एनसीसी, एनवायके आणि एनएसएस यांच्यामार्फत समुदाय एकत्रीकरणासाठी स्वयंसेवक मिळावेत, आयएमए, निमा, आयएपीसारख्या व्यावसायिक संस्थांकडून विविध बाबतीत साहाय्य मिळावे. लसीकरण जनजागृतीसाठी माहिती व संपर्क विभागाची मदत मिळावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

कृती आराखडा :

जिल्हा आणि तालुकास्तरावरील अधिकार्‍यांचे गोवर-रुबेला निर्मूलन लक्ष्यबाबत संवेदनीकरण करणे
गोवर-रुबेला निर्मूलनाबाबतीत जिल्हा उपजिल्हा टास्क फोर्सच्या बैठकींना पुन्हा सुरुवात करणे
उद्रेक आलेल्या भागांत विशेष लसीकरण सत्रे घेणे
अतिजोखमीच्या भागांना विशेष प्राधान्य
बालवाड्या, पाळणाघरे या ठिकाणी प्रवेश करतेवेळी लसीकरण इतिहास तपासणे
मध्यम आणि अतिजोखमीच्या जिल्ह्यांसाठी विशेष सूचना
मध्यम जोखमीच्या जिल्ह्यांत मासिक आढावा घेणे आणि अतिजोखमीच्या जिल्ह्यांत पाक्षिक आढावा घेणे
कमी लसीकरण असलेल्या क्षेत्रात मासिक संनियंत्रण/ सहायक देखरेख बैठक घेणे आणि सुधारात्मक कृती करणे
लसीकरणासाठी 5 वर्षांखालील बालकाची मोजणी, उद्रेक क्षेत्र, गोवर प्रादुर्भाव व लस उपलब्धतेनुसार मोहीम राबविणे
रुग्णशोध, चाचण्या आणि नमुन्यांची गुणवत्ता वाढविणे
उद्रेक भागांत जीवनसत्त्व ’अ’ची पूरक मात्रा देण्यात यावी
उद्रेक भागांत घरोघरी सर्वेक्षणात सुटलेल्या सर्व लाभार्थींना जीवनसत्त्व ’अ’ चा डोस दिला जावा.

Back to top button