कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात | पुढारी

कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ परिसरात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध व बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. माल वाहतुकीच्या वाहनांमधून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कारवाई करण्याची गरज आहे.  अवैध व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. सुसाट वेग, बेशिस्तपणा, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे भीषण अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तरीही बेशिस्त वाहनचालकांना समज येत नाही. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी टप्पा वाहतूक, परवानाधारक विविध वाहने व एसटी बसचा उपयोग होतो. मात्र, या नियमांचे वाहनचालकांना काही घेणे देणे राहिले नाही.  लग्नाचे वर्‍हाड, मजूर कामगार, कंत्राटी कामगार, ऊस तोडणी कामगार यांच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी सर्रास माल वाहतूक वाहनांचा वापर होत आहे. वाहनांच्या मागील बाजूस त्यांना अक्षरश कोंबून बसविले जाते. ड्रायव्हर सीटच्या वरील टपावर, मागील बाजूस फाळक्यावर बसलेले किंवा उभे असतात, हे धोकादायक आहे. कुठल्याही कारवाईला न जुमानत अशी वाहतूक केली जाते. याबाबत संबंधित प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Back to top button