पिंपरी : ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी राष्ट्रवादी पालटणार फासे | पुढारी

पिंपरी : 'करेक्ट कार्यक्रमा'साठी राष्ट्रवादी पालटणार फासे

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मावळ आणि शिरूर मतदारसंघातून उमेदवारीचे फासेच पलटण्याची खेळी करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याने भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके आणि शिरूरमधून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ही लढत लक्षवेधक ठरू शकते. सध्या तरी जर-तरच्या गणितांवर अंदाज बांधले जात असले तरी राष्ट्रवादीकडून या पद्धतीने राजकीय व्यूहरचना आखली गेल्याचे दिसत आहे. गतनिवडणुकीत अतिशय सोप्या वाटणार्या बालेकिल्यातच पार्थ पवारांच्या पराभवाचा घाव वर्मी लागल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व्यथित झाले होते.

आपल्याच मावळ्यांनी घात केल्याची भावना स्वाभाविक होती मात्र, त्यानंतर बरेच पाणी वाहून गेल्यानंतर आता मतदारसंघात पक्षीय पेरणी करण्याबरोबरच उमेदवारीच्या पातळीवर उलटफेर करण्याचे नियोजन झाल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का देणारे अमोल कोल्हे यांचे पक्षातील आणि एकूणच राजकीय वजन वाढले. पक्षाच्या कोअर कमिटीच्या पंगतीत त्यांना मानाचे स्थान होते.

अचानक गणित बिघडले आणि त्यांची भाजपशी जवळीकीच्या चर्चा आणि स्टार प्रचारकाच्या यादीतून नाव गायब झाले. वास्तविक मालिकांमधून ऐतिहासिक कलाकृती साकारुन त्यांनी कमविलेली इमेज आणि उत्तम वक्तृत्वशैली पाहता सध्या तरी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांने नाव अग्रस्थानी अपेक्षित आहे. असे असताना नेमके काय घडले, याचे उत्तर शिरुर लोकसभा मतदार संघाच्या राजकीय घडामोडींमध्ये दडले असण्याची शक्यता आहे. मतदार संघात खासदार कोल्हेंवर नाराजी आणि पार्थ पवारांसाठी चाचपणीची चर्चा यामुळे या घडामोडी घडत असल्याची कुजबुज आतल्या गोटात सुरु आहे. कोल्हे यांनी याबद्दल कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तरी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केल्याने ते भाजपमध्ये जाणार या चर्चेबाबत गुढ वाढविले आहे.

तिकडे आढळराव पाटील यांनी शिंदे गटात उडी मारुन लोकसभेच्या उमेदवारीसाठी शड्डू ठोकले आहे. मात्र, कोल्हेंचे इनकमिंग झाल्यास भाजप त्यांनाच उमेदवार देणार हे स्पष्ट आहे. असे घडल्यास आढळराव-पाटील यांची मनधरणी शिंदे गट कशी करणार आणि ते कोल्हे यांना विजयी करण्यासाठी मदत करणार का? हा प्रश्न आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांना रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. तसे झाल्यास विद्यमान खासदार बारणे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

सुनील शेळके हे पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे ते नातेवाईक आहेत. शहरातील नात्यागोत्याच्या राजकारणाचे आडाखे सर्वज्ञान आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत महेश लांडगे वर्चस्व आहे. अशातच खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेत बारीकसारीख गोष्टींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या राजकारणात बारणे यांना आलेले महत्त्व पाहता भविष्यात बारणे व लांडगे यांच्यात सुक्त संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे लोकसभेवेळी भाजप मनापासून बारणेंच्या पाठीशी राहणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शेळके यांचे पक्षात वाढलेले वजन आणि अजित पवार यांच्या मर्जीतील म्हणून त्यांची असलेली ओळख यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते आणि गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अजित पवार ही लढत प्रतिष्ठेची केल्यास बारणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहू शकते. दुसरे महत्वाचे म्हणजे स्थानिक भाजप नेत्यांकडून मनापासून पाठींबा मिळविण्याबरोबच शिवसेनेच्या मतांचे विभाजन होऊ न देण्याचे दुहेरी आव्हान बारणे यांच्यासमोर आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मतदार त्यांना मदत करणार की विरोधात जाणार यावरही बरेच अवलंबून आहे.

मावळ तालुक्याचा गेल्या पंचवीस वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळे मला मावळ विधानसभा मतदारसंघातच काम करण्याची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींनी पुन्हा संधी दिल्यास मावळ तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करेन.
 – सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष आहेत. राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडत असतात. येत्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचा उमेदवार मीच असणार आहे. माझ्यासमोर कोण लढणार याची मला पर्वा नाही. माझ्या कामाच्या व जनसंपर्काच्या बळावर मी निवडणुकीला सामोरे जाईन. पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने माझ्या विरोधात रिंगणात उतरविले त्याची पर्वा मी केली नाही माझा माझ्या कामावर विश्वास आहे. जनता जनार्दन मला नक्कीच न्याय देईल.

– श्रीरंग बारणे, खासदार मावळ

शिरूर मतदार संघात पार्थ पवार यांचे नाव आल्याने मी अस्वस्थ आहे असं म्हणणे म्हणजे अकारण घाई होत आहे. मला पदाचा, सत्तेचा मोह नाही पाच वर्षाची जबाबदारी मला दिली आहे मतदार संघ ही माझी जहागिरी नाही तर जबाबदारी आहे मतदार संघाच्या विकासासाठी भाजपच्या नेत्यांनाही भेटावे लागते त्याचा वेगळा अर्थ काढणे अयोग्य आहे लोकसभा निवडणूक सन 2024 मध्ये होणार आहे त्यामुळे मी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असण्याचे कारण नाही
– डॉ. अमोल कोल्हे (खासदार शिरूर)

 

अशी झाली सन 2019 ची लोकसभा निवडणूक

मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना) 7 लाख 20 हजार 663 विजयी
पार्थ पवार (राष्ट्रवादी) 5 लाख 4 हजार 750

शिरूर
डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) 6 लाख 35 हजार 830
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) 5 लाख 77 हजार 347

Back to top button