पुणे पोलिस राज्यात अव्वल | पुढारी

पुणे पोलिस राज्यात अव्वल

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पुरस्कार’ या स्पर्धेत पुणे पोलिस दल राज्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून ही स्पर्धा घेण्यात आली होती. दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरीत तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहीत करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये पुणे पोलिस अव्वल ठरले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व प्रादेशिक विभाग, पश्चिम प्रादेशिक विभाग व गुन्हे विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांनी केलेल्या कामामुळे पुणे पोलिसांना पुरस्कार प्राप्त झाला.

खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या अशा शिर्षकाखाली वर्षभरामध्ये दाखल होणारे गंभीर गुन्हे, तपासावर प्रलंबित राहणार्‍या गुन्ह्यांची संख्या, अवैध धंद्यांवरील प्रभावी कारवाई (पिटा कायदा,अंमली पदार्थ विरोधी कायदा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे), माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारे दाखल होणारे गुन्हे, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावीपणे होणारी कारवाई (मोका, एमपीडीए, तडीपार) दिर्घकाळ फरारी आरोपींचा शोध, दुर्बल घटकांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची तत्काळ निर्गती, महिला,बालके अत्याचाराविरुद्ध तत्काळ कारवाई,प्रशासकीय कामकाज जलदगतीने करणे, अपघात कमी करणे, जातीय व सामाजिक सलोखा टिकविणे, अशा विविध मुद्यांसाठी निवड समितीने मुल्यांकन केले. त्यामध्ये 6 हजार जास्त गुन्हे असलेल्या पोलिस 24 घटकांमधून पुणे शहर पोलिसांची सर्वोत्कृष्ट पोलिस घटक’ म्हणून समितीने निवड केली.

राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने उत्कृष्ट पोलिस घटक पुरस्कार’ आयोजित केला होता. मागील एक वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन, ज्यांची भारतीय दंडविधान कलमान्वये गुन्हे 6 हजारांपेक्षा जास्त आहेत, अशा राज्यातील 24 घटकांची श्रेणी तयार करण्यात आली होती. त्यांच्या कामगिरीच्या मुल्यांकनासाठी पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. पोलिस महासंचालक कार्यालयातील अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अध्यक्ष व इतर सदस्य म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस अधिक्षक जळगाव, पोलिस अधिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र यांचा समितीत समावेश होता.

प्रत्येकवेळी अधिक चांगले काम करण्यावर आमचा भर असतो. त्यादृष्टीने प्रयत्न केले. सगळे काम केल्यानंतर अधिक चांगले काम कसे करायचे, हे आम्हाला या पुरस्कारामुळे कळले.या पुढेही असेच चांगले काम करू”

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

Back to top button